पारनेर, दि. 25 (प्रतिनिधी)- तालुक्यातील एका व्यक्तीच्या घरातील दुखणे दूर करण्यासाठी जादूटोणा करण्याच्या नावाखाली साडेपाच लाख रुपये उकळणारा, त्याच घरातील तरुणीवर एअरगणचा धाक दाखवून अत्याचार करणारा तसेच पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली पैसे उकळणारा योगी महादेवनाथ बाबा उर्फ ज्ञानदेव तुकाराम कांबळे (रा शिर्सुफळ, अटोळे वस्ती, बारामती, जि. पुणे) याच्या पारनेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्यावर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने पारनेर तालुक्यात आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत.
पीडित तरुणीने पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घरातील मेंढया व माणसे सतत आजारर पडत असल्याने सन 2020 मध्ये महादेवनाथ बाबा याने तुमच्या कुटुंबावर करणी केली असल्याने दोन होम करावे लागतील, त्यासाठी 1 लाख 10 हजार रूपये खर्च येईल, असे सांगितले.
घरातील आजारपण दूर होत नसल्याने हतबल झालेल्या पीडितेच्या वडिलांनी बाबा त्यावर इलाज करेल, या आशाने होम हवनासाठी पैशांची जमवाजमव केली. योगी महादेवबाबा यास फोन केला असता आंबी, घारगाव (ता. संगमनेर) येथील मठावर मी असून तेथे पैसे आणून द्या, असे त्याने सांगितले. पैसे नेऊन दिल्यानंतर घरी येऊन होम हवन केले. तुमची पीडा कमी होईल, असे सांगून बाबा निघून गेला. दोन महिन्यांनंतर तीस हजार रुपये घेऊन बाबाने दुसरा होम केला. मात्र, दोन ते तीन महिन्यांत काहीही फरक पडला नाही. मेंढ्या मरत होत्या. पीडितेसह तिचा भाऊ हे सतत आजारी पडत होते. भोंदू बाबाने अनेक ठिकाणी फसवणूक केली असून पोलिस याचा शोध घेणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली.
चौकट
पैसे घेऊन ठोकली धूम !
बाबाने पुन्हा पीडितेच्या घरी येऊन पैशांचा पाऊस पाडतो, असे तिच्या वडिलांना सांगितले. पाऊस पाडण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. वडिलांनी वडझिरे व देवीभोयरे या गावांतील काही लोकांना त्याबाबत सांगितल्यानंतर त्यांनी त्यास 3 लाख 60 हजार रुपये दिले. पैसे घेऊन गेल्यानंतर तो परत गावाकडे फिरकला नाही. आज उद्या करीत तो वेळ मारून नेत होता.