श्रीगोंदा – सोशल मीडियावरील ओळखीच्या आधारे स्वस्तात सोन्याच्या नावाखाली एकाची दोन लाखांना फसवणूक करण्यात आली. बुधवारी (दि. 3) तालुक्यातील घोगरगाव शिवारात ही घटना घडली असून, या प्रकरणी दीपक कोंडीबा वाघमारे (वय 22, रा. कुरुंदा, ता. वसमत, जि. हिंगोली) यांच्या फिर्यादीवरून अविनाश भोसले (रा. गुंडाचीवाडी, कुळधरण, ता. कर्जत) आणि इतर दोन जणांवर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार कुरुंदा येथील दीपक कोंडीबा वाघमारे या तरुणाची इंस्टाग्रामवरून कर्जत येथील अविनाश भोसले या इसमाशी ओळख झाली होती. दि. 5 जुलै रोजी अविनाश भोसले याने दीपक वाघमारे याला फोन करून दोघांनी एकमेकांची ओळख काढत संपर्क करू लागले असताना त्यांची मधील काळात मैत्री होऊन वारंवार होणाऱ्या संभाषणातून एकमेकांवर विश्वास बसला होता.
एक दिवस अविनाश याने फोन करून त्याच्याकडे कमी दरामध्ये सोने मिळत असल्याचे सांगत “तुला पाहिजे असेल तर सांग’ असे सांगितल्याने तयार झालेल्या विश्वासातून दीपक वाघमारे याने घरच्यांशी विचारविनिमय करत दोन लाख रुपये सोने खरेदी करण्याची तयारी दाखविली. त्यानुसार दीपक वाघमारे आणि त्याची आई दि. 3 ऑगस्ट रोजी श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव या ठिकाणी आले असता तेथील परिसरातील एका झाडाखाली दोन इसम व एक महिला असे उभे होते. तेथे दोघांना बोलावून घेत अविनाश भोसले आणि उर्वरित दोघांनी दोन लाख रुपये घेऊन रुमालामध्ये बांधून आणलेल्या सोन्याच्या चैन दाखवत त्याचे वजन 16 तोळे असल्याचे सांगितले. दोन लाख रुपये देऊन सोन्याचे दागिने घेऊन कुरुंदा येथे माघारी जाऊन सोनारकडे जाऊन चौकशी केली असता त्या सोन्याच्या चेन बनावट असल्याचे समजल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी श्रीगोंदा पोलिस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला.