पोंदेवाडी परिसर हा सुमारे 30 वर्षांपूर्वी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता; परंतु या भागातून गेलेल्या डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यामुळे शेती बाराही महिने ओलिताखाली आली आहे आणि वर्षानुवर्षे जिरायती भाग म्हणून ओळखला जाणारा हा परिसर शंभर टक्के बागायती झाला आहे. अर्थात याचे श्रेय राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 15 वर्षे उपसरपंच आणि सरपंच पदावर काम करीत गाव विकासाचा ध्यास घेतलेले लोकनियुक्त प्रथम सरपंच अनिल वाळुंज यांनाच द्यावे लागते. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पोंदेवाडी हे गाव महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील उपजिल्हा मुख्यालय घोडेगाव (तहसीलदार कार्यालय) पासून 27 किमी अंतरावर आणि पुणे जिल्हा मुख्यालयापासून 77 किमी अंतरावर आहे. 2009 च्या आकडेवारीनुसार पोंदेवाडी गाव देखील ग्रामपंचायत आहे. या गावाची लोकसंख्या 1 हजार 498 आहे आणि गावात सुमारे 365 कुटुंबे आहेत. हे गाव डोंगराच्या पायथ्याशी आहे. घोडनदीपासून या गावाचे अंतर दूर आहे. मात्र, दिलीप वळसे पाटील यांच्या पाठपुरव्यातून डिंभे धरणातून उजवा कालवा या गावातून गेला आणि या गावाचे रूपच पालटले. या संधीचा गावाच्या विकासासाठी अनिल वाळुंज यांनी अत्यंत नियोजन पद्धतीने फायदा करून घेतला. गाव विकासाचा ध्यास घेतलेल्या अनिल वाळुंज यांची उपसरपंच-सरपंच अशी सुमारे 15 वर्षांची कारकीर्द गावाला लाभली आहे. पुढील आठ महिन्यांच्या काळात येथे निवडणुका लागणार आहेत आणि त्यांचेच पॅनेल पुन्हा सक्रिय होणार आहे. अर्थात अनिल वाळुंज यांचा दृढनिश्चिय त्यांच्या कामाची पावती आहे आणि हा त्यांचा स्वतःच्या कामावर असलेला विश्वास आहे. अनिल वाळुंज पोंदेवाडी ग्रामपंचायतीवर त्यांच्या कामातून ठसा उमटवला आहे. आज गावाचे चित्र खूप बदलले आहे. गावात सुबत्ता आहे. गाव शंभर टक्के स्वयंपूर्ण होण्यासाठी अनिल वाळुंज यांनी अमाप सहकार्य केले आहे. ग्रामपंचायत स्तरावर वैयक्तिक लाभाच्या योजना राबवण्यात आंबेगाव तालुक्यात अनिल वाळुंज यांची पोंदेवाडी ग्रामपंचायत अग्रेसर आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या, विद्यार्थ्यांसाठी, बचत गटांसाठी, महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी सार्वजनिक आणि भौतिक सुविधा पोहोचवण्यात अनिल वाळुंज यांचा हात कोणी धरू शकत नाही. 15 वर्षांत सुमारे 40 कोटींचा निधी त्यांनी गाव विकासासाठी राबवला आहे. गाव डोंगर पायथ्याशी असल्याने येथील वाड्या-वस्त्या विखुरलेल्या आहेत. शेती आणि तिथेच घर अशी ग्रामस्थांची राहण्याची पद्धत आहे; पण प्रत्यके वाडी-वस्तीवर घराघरांपर्यंत रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहे. कालव्याच्या माध्यमातून विकासाची गंगाच पोंदेवाडीत आली आहे, त्यामुळे शेती आणि पिण्यासाठी पाणी आणि वीज या दोन्ही गोष्टी मुबलक आहेत, त्यामुळेच बागायत झालेल्या शेतीच्या 2700 हेक्टरवर प्रामुख्याने ऊस, कांदा, तरकारी, गवार, धना-मेथी अशी शेती फुलली आहे. गावातील चौकातच अनेकवेळा बाजार भरतो आणि शेतातील माल येथेच विकला जाईल, अशी सोय करण्यात आली आहे. या गावात कालवा येण्याआधी रोजगार नाही, शेती नाही यामुळे ग्रामस्थ रोजंदारीसाठी पुणे-मुंबई येथे निघून गेले होते. मात्र, कालव्याचे पाणी आले आणि सरपंच अनिल वाळुंज यांनी शासकीय योजना राबवण्यास सुरुवात केली आणि रोजगारासाठी बाहेर गेलेल्या ग्रामस्थांना येथेच रोजगार मिळत असल्याने ते परतही आले आहेत. या पोंदेवाडी गावाजवळून बेल्हे-जेजुरी आणि ओझर-रांजणगाव हे दोन प्रमुख रस्ते जात असल्याने त्याचाही फायदा बाजारासाठी आणि उद्योग-व्यापार वाढण्यासाठी अनिल वाळुंज यांनी करून घेतला. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना तरकारी विकण्यासह हॉटेल व्यवसायातही गती मिळाली आहे. आरोग्याच्या बाबतीतही गाव आघाडीवर आहे. आतापर्यंत 400 कुटुंबांना स्वच्छतागृहासाठी अनुदान देण्यात आले आहे आणि शंभर टक्के गाव हगणदारीमुक्त करण्यात आले आहे. अनिल वाळुंज यांचे कार्य मोठे आहे, त्यांच्या कामाचा उल्लेख सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही केला आहे. त्यांच्या वैयक्तिक लाभाच्या कामाचेही तालुक्यात कौतुक होत आहे. त्यांच्या या कामात त्यांच्या पत्नी नीलम वाळुंज यांचाही मोठा सहभाग आहे. त्या येथील खरेदी-विक्री संघाच्या विद्यमान संचालक आहेत. अनिल वाळुंज हे देखील सात वर्षे संचालक आणि दोन वर्षे अध्यक्ष होते. एकत्र कुटुंब पद्धतीवर त्यांचा विश्वास आहे. आई, भाऊ, गावातील तरुण-ज्येष्ठ या सर्वांबरोबर काम करण्याचे त्यांचा विशेष त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे. घरघंटी वाटप पोंदेवाडी गावापासून पिठाची गिरणी सुमारे पाच किलोमीटर अंतरावर होती. पीठ आणण्यासाठी महिलांची पायपीट होत होती. हे लक्षात घेऊन अनिल वाळुंज यांनी घराघरांत पिठाची गिरणी मोफत देण्याचे काम केले आहे. सुमारे 300 गिरण्यांचे वाटप करण्यात आले आहे आणि पुढील पंधरा दिवसांत 50 गिरण्यांचे वाटप होत आहे. गाव गिरणीमुक्त करण्याचा त्यांचा संकल्प आहे. महिला सक्षमीकरणाचे कार्य सरपंच अनिल वाळुंज यांनी त्यांच्या कारकिर्दीत 16 बचत गटांच्या माध्यमातून महिला आर्थिक सक्षमीकरणाचे कामही मोठे केले आहे. यासाठी व्यवसाय शिबिरांचे आयोजन, राळेगणसिद्धी, तळेघर येथे महिलांसाठी प्रशिक्षण सहलींचेही आयोजन केले आहे. महिलांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. सगळ्यात जास्त पोल्ट्रीज् आंबेगाव तालुक्यात शेतीपूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसायाला चालना देण्यात आली आहे, यात अनिल वाळुंज यांचे कार्य मोठे आहे. आंबेगाव तालुक्यातील सर्वाधिक पोल्ट्री व्यवसाय या पोंदेवाडी गावात विस्तारला आहे. संकलन : संतोष वळसे पाटील