पुणे – राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक, मुख्याध्यापकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने लाभ मिळवून देण्यासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
शिक्षकांना 1 जानेवारी 1986 पासून केंद्र शासनाच्या धर्तीवर वेतनरचना मंजूर करण्याच्या निर्णयानुसार विविध संवर्गात मूळश्रेणी, वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी संबंधित नियम लागू राहणार आहे. यावेतन श्रेणीत पात्र होण्यासाठी अटींची पूर्तताही करणे आवश्यक आहे. यात काही सुधारणाही करण्यात आलेल्या आहेत.
शिक्षकांना किमान तीन आठवड्यांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी अथवा किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी 50 तासांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. दहा दिवसांच्या ऑनलाइन अथवा ऑफलाइन प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत करण्यात येणार आहे. वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आवश्यक प्रशिक्षण शासनस्तरावरून आयोजित न केल्यामुळे वरिष्ठ व निवड श्रेणीच्या लाभापासून वंचित असलेल्यांच्या बाबतीत दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना वरिष्ठ, निवड श्रेणीपासून पात्र दिनांकापासून लाभ देण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश सहसचिव राजेंद्र पवार यांनी काढले आहेत.