वीसगाव खोरे, (वार्ताहर) – सध्या महागाईने रोद्ररूप धारण केले आहे. घरातील कर्त्या पुरुषावर संपूर्ण प्रपंच चालवणे अवघड झाले आहे. त्यामुळे पती आणि पत्नी दोघेही शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागामध्ये सुद्धा नोकरी करू लागले आहेत. भोर तालुक्यातील ग्रामीण भागातील तरुण-तरुणी शिरवळ एमआयडीसीमध्ये रोजगाराच्या निमित्ताने जात असतात. घरामध्ये असणाऱ्यांना लहान बाळांना सांभाळण्याची जबाबदारी घेणे अवघड होऊन बसले आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातही शहरासारखी पाळणाघर ही संकल्पना रुजू लागली आहे. दिवसभर माता पिता नोकरीच्या निमित्ताने बाहेर असतात. त्यांच्या मुलांचे संगोपन करणे यासाठी अशी पाळणा घर ही संकल्पना पुढे आली आहे. या निमित्ताने शहरांमधील पाळणा घराची संस्कृती गावांमध्ये रुजू लागलेली पहावयास मिळत आहे. अलीकडच्या काळात शहरांलगत असणारे खेडे गावे यामध्ये प्रामुख्याने पाळणाघर,प्ले ग्रुप सुरू झालेले पहावयास मिळतात.
मुलांच्या संगोपनासाठी मुला मुलांचे आई वडील हे दोघेही नोकरी करत असल्यामुळे मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यासाठी सक्षम यंत्रणा यंत्रणा म्हणून पाळणाघर व प्ले ग्रुप खेडेगावातील सुरू करण्यात येत आहे.
पाळणाघरात मुलांसाठी वर्ग खोल्या, बाळाचे संगोपन कसे होते यासाठी सीसीटीव्ही कव्हरेज, विशेष करून पिक-अप ड्रॉप सुविधा तसेच अन्न, दूध, झोपण्यासाठी हॉल, मोकळे खेळाचे मैदान त्याच बरोबर खेळ साहित्य तसेच विविध उत्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
डे केअर सेंटरमध्ये मुलांना दिवसभर ठेवण्याची सोय केली जाते. त्यांचे खाणे पिणे त्यांचा आराम खेळ तसेच गटानुसार त्यांना शिकवले जाते. यामधून मुलांचा संगोपनाबरोबर चांगल्या सवयी तसेच प्राथमिक शिक्षणासाठी सज्ज करण्याची तयारी करून घेतली जाते. -प्राजक्ता संकपाळ, संचालक, बाळ प्ले स्कूल, डे केअर सेंटर उत्रौली (ता.भोर)