सासवड -पुरंदर तालुक्यातील महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले आकारली जात आहेत. लॉकडाऊनमुळे हातात कमी पैसे असताना हजारोंच्या घरात आलेली वीज बिले पाहून ग्राहकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. कोणत्याही प्रकारची ट्रेडिंग लॉकडाऊनच्या काळामध्ये न घेताच बिलांचा भडिमार केला आहे. ठेकेदार घरात बसूनच रीडिंगचे काम करीत असल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी केल्या आहेत.
पुरंदर तालुक्यात सध्या एका कंपनीने मीटर रीडिंगसाठी ठेका घेतला असून त्याच्याकडे मनुष्यबळाचे प्रमाण कमी असल्याने कामे वेळेत पूर्ण होत नाहीत, अशी चर्चा सुरू आहे. ही बिले वेळेत वाटप होत नसल्याने ते ग्राहकांपर्यंत न पोहोचल्याने मुदत निघून गेल्याने बिलाच्या दंडाची रक्कम ग्राहकांना सोसावी लागत आहे. जेजुरी व सासवड विभाग आहेत. यापैकी सासवड विभागात दिवे, खळद, राजेवाडी, पुरंदर, चांबळी, वाघापूर, सासवड आदी सात विभागांमध्ये महावितरणचे काम सुरू असते.
महावितरणकडून बिले वेळेत न दिल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बिलाचा रकमा कमी करण्यासाठी किंवा बिल भरण्यासाठी सासवडला किंवा परिसरामधील बॅंकेमध्ये तासन्तास ताटकळत थांबावे लागत आहे. चुकीच्या पद्धतीच्या बिलाचा भरणा कसा करावयाचा, हा प्रश्न ग्राहक, शेतकऱ्यांना सतावत आहे. करोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना आता वाढीव बिलांचा शॉक दिला आहे.
तीन महिन्यांपासून सरासरी बिल देणाऱ्या महावितरणने ग्राहकांना भरमसाठ बिल पाठवली आहेत. अनेक ग्राहकांनी सरासरी वीज बिले भरली, तरीही महावितरणने त्यांना मोठ्या रकमेची वीज बिले पाठवली. याबाबत महावितरणच्या कार्यालयात पाठपुरावा केला तर कमी मनुष्यबळाचे कारण देत टोलवाटोलवी केली जात आहे.
सध्याचा ठेकेदारांकडे रीडिंग घेणे, बिल छापणे व बिल वाटप करणे हे काम आहे. ज्या ग्राहकांची बिले चुकलेली असतील. त्यांची बिले दुरुस्ती करून दिली जातील. ज्या ग्राहकांचे बिल मोठ्या रकमेत असेल, त्याचे तीन हप्ते करून देण्यात येत आहेत. ज्या ग्राहकांनी संपूर्ण बिल भरले आहे, अशा ग्राहकांना बिलावर 2 टक्के सवलत देण्यात येत आहे.
– उमेश सासणे, उप कार्यकारी अभियंता, सासवड.
महावितरण कंपनी सध्याची बिले भरमसाठ देत आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बिले दुरुस्तीसाठी कामधंदा सोडून महावितरणच्या दारात हेलपाटे मारावे लागत आहेत.
– सुदाम खेडेकर, ग्राहक, सचिव ग्राहक हक्क संरक्षण समिती.