पुणे – शहरातील लसीकरण वेगाने होण्यासाठी महापालिकेने सीरमकडून थेट लस घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी महापौरांनी पुढाकार घेतल्यानंतर गुरुवारी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह महापालिका आयुक्त विक्रम कुमार, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सीरमच्या वरिष्ठ अधिकारी डॉ. सुरेश जाधव यांची भेट घेतली.
यावेळी शहराला लस देण्याबाबत सुमारे अर्धातास चर्चा करण्यात आली. यावेळी केंद्र शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या आधारे कशाप्रकारे शहरासाठी लस देता येईल याबाबत चर्चा करण्यात आल्याचे महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले. तसेच लस मिळण्याबाबत काही तांत्रिक अडचणी असून त्या कशाप्रकरे दूर करता येतील याबाबत चर्चा करण्यात आल्याचे महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.
थेट लस मिळण्यात नियमांचा अडथळा
केंद्र शासनाने लसींबाबत जाहीर केलेल्या धोरणानुसार, सीरममध्ये तयार होणाऱ्या लसीमधील 50 टक्के लस केंद्र सरकार घेणार असून 25 टक्के लस राज्यशासन, तर 25 टक्के लस खासगी रुग्णालयांना देणे बंधनकारक केले आहे.
या नियमामुळे सीरमला महापालिकेस लस देता येणार नाही तसेच पुण्यासाठी विशेष बाब म्हणून लस दिल्यास देशभरातील इतर शहरेही लसची मागणी करतील, त्यामुळे केंद्र शासनाकडूनच विशेषबाब म्हणून परवानगी मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार, महापालिका प्रशासनाकडून आता पुढील दिशा ठरवली जाणार असून सीरमकडूनही सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
सीरम इन्स्टिट्यूटकडे लस मिळविण्यासाठी गेली दोन आठवडे मी स्वतः बैठका घेऊन पाठपुरावा करत आहे. सीरमचीही पुण्याला लस देण्याची तयारी आहे. मात्र, त्यासाठी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र, राज्य सरकारशीही माझा पत्रव्यवहार सुरू आहे.
यावर लवकर मार्ग निघेल, हा विश्वास वाटतो. पुणेकरांना शक्य तितक्या कमी वेळात अधिकाधिक लसीकरण करण्यासाठी कसोशिने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये प्रत्यक्ष जाऊन चर्चाही केलेली आहे.
– मुरलीधर मोहोळ, महापौर