उत्तरप्रदेशच्या मंत्र्याचे वक्तव्य
बलिया : कॉंग्रेस हा पाकिस्तान समर्थक पक्ष आहे. त्या पक्षाची विचारसरणी विभाजनवादी आहे. राहुल आणि प्रियांका गांधी या कॉंग्रेस नेत्यांना पाकिस्तानात रोल मॉडेल मानले जाते, असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे मंत्री आनंदस्वरूप शुक्ला यांनी केले.
शुक्ला यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना कॉंग्रेसबरोबरच राहुल आणि प्रियांका यांच्यावर टीकेची झोड उठवली. जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा हटवण्यात आल्यावरून कॉंग्रेसने निदर्शने केली. त्या पक्षाचा देशाचे तुकडे करू इच्छिणाऱ्यांना पाठिंबा आहे. राहुल आणि प्रियांका यांच्या पोस्टर्सनी पाकिस्तानच्या भिंती सजतात.
प्रियांका यांच्या पतीने गरिबांच्या जमिनी बळकावल्या. त्यामुळे त्यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यांनी त्यांचे भाऊ राहुल आणि आई सोनिया गांधी यांच्याबद्दल बोलावे. ते दोघेही नॅशनल हेरल्ड प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत, असे शुक्ला यांनी म्हटले. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावरही शुक्ला यांनी शाब्दिक हल्ला चढवला. अखिलेश यांचे राजकारणातील महत्व संपले आहे, असा दावा त्यांनी केला.