पिंपरी – वाकड आणि निगडी येथे अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत दोन ज्वेलर्सची दुकाने फोडली. या घटना रविवारी (दि. 20) सकाळी उघडकीस आल्या.
म्हातोबा नगर, वाकड येथे पी. आर. ज्वेलर्स हे दुकान आहे. शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातून चोरट्यांनी तीन किलो चांदी आणि पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. वाकड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत अधिक तपास सुरु आहे.
चोरीची दुसरी घटना आकुर्डी येथील विठ्ठल मंदिराजवळ श्री नवकार ज्वेलर्स या दुकानात घडली. शनिवारी रात्री श्री नवकार ज्वेलर्सच्या मालकाने नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. रविवारी सकाळी त्यांना दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्यांनी शटर उचकटून आतील चांदीच्या वस्तू चोरून नेल्या आहेत. मात्र दुकानात किती रुपयांची चोरी झाली याबाबत निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. निगडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
लॉकडाऊनच्या अगोदरच्या काळात चोरट्यांनी शहरातील एटीएम आणि सराफांच्या दुकानांना टार्गेट केले होते. यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविली होती. स्थानिक पोलिसांच्या मदतीला गुन्हे शाखेचे कर्मचारीही देण्यात आले होते.
गस्त घालणाऱ्या पोलिसांना सराफाची दुकाने आणि एटीएम सेंटरवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र वाकड पोलिसांनी एटीएम फोडणारी टोळी पकडल्यानंतर हा प्रकार बंद झाला. मात्र रविवारी पहाटे चोरट्यांनी पुन्हा सराफांच्या दुकानांना लक्ष्य केल्याने शहरातील सराफांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.