इंग्लंडमध्ये रुग्णवाहिकांची टंचाई तर कॅनडात कर्मचारीच नाहीत
लंडन : करोना महामारीच्या कालावधीमध्ये आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर ताण पडल्यानंतर आता जगातील सर्वच देशांमध्ये आरोग्य व्यवस्था काही प्रमाणात ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. ज्या देशांमध्ये आरोग्य व्यवस्था सर्वात आदर्श मानण्यात येते अशा इंग्लंडमध्ये सध्या रुग्णवाहिकांची टंचाई भासत आहे, तर कॅनडामध्ये आरोग्य कर्मचारीच उपलब्ध नाहीत.
ब्रिटनमध्ये जर कोणाला हृदयविकाराचा झटका आला तर त्यांच्यापर्यंत रुग्णवाहिका पोहोचण्यासाठी तब्बल 90 मिनिटांचा कालावधी लागत आहे. कारण योग्य प्रमाणात रुग्णवाहिकांची उपलब्धताच आता राहिलेली नाही कॅनडातील परिस्थिती सुद्धा अत्यंत खराब असून रुग्णालयांमध्ये कर्मचारी नसल्याने रेड क्रॉस सोसायटीच्या काही मानसेवी कर्मचाऱ्यांना लहान मुलांच्या रुग्णालयात कामासाठी बोलवण्यात आले आहे.
स्वित्झर्लंडसह युरोपमधील बहुतेक देशांमध्ये गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये मृत्यूदरात तब्बल 10% वाढ झाली आहे. बहुतेक देशांमध्ये डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अतिशय कमी वेतन दिले जात असल्याने त्याचा फटका आरोग्य सेवेला बसत आहे. जर एखाद्या रुग्णाने डॉक्टरला किंवा रुग्णालयाला फोन केला तर प्रतिसाद मिळण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. ब्रिटनसारख्या देशांमध्ये आरोग्यावर खूपच कमी पैसा बजेटमध्ये खर्च केला जात असल्याने त्याचा फटका या देशांना बसत असल्याचे सांगण्यात येते.
एकूण परिस्थिती पाहता ब्रिटन सरकारने गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ केली असली तरी अजून परिस्थिती नियंत्रणाखाली आलेली नाही. सध्या युरोपमध्ये सर्वत्र तीव्र हिवाळ्याची परिस्थिती असल्याने आरोग्य परिस्थितीसुद्धा बिघडली आहे, पण रुग्णांची योग्य देखभाल रुग्णालयात होईल अशी कोणतीही खात्री दिली जात नाही.