Karnataka – कर्नाटकातल्या अलियााबाद औद्योगिक परिसरातील एका खाजगी अन्न प्रक्रिया युनिटच्या गोदामात मशिनरी कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७ मजुरांचा मृत्यू झाला. हे सातही मजुर बिहारमधील होते. या फूड प्रोसेस कारखान्यात 100 टन मका उचलला जात होता, त्यावेळी ही मशिन कोसळली आणि त्या मक्याच्या ढिगाऱ्याखाली हे मजूर चिरडले गेले.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना कर्नाटक सरकारने प्रत्येकी सात लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. जखमींना 50 हजार रुपये मिळणार आहेत. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली.
सोमवारी संध्याकाळी ६ वाजता सुरू झालेल्या आणि मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू असलेल्या शोध आणि बचाव मोहिमेदरम्यान, सात मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तर एका व्यक्तीला वाचवण्यात यश आले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
विधानसभेच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी बेळगावी आलेले कर्नाटकचे जिल्हा प्रभारी मंत्री एम बी पाटील यांनी घटनेची माहिती मिळताच विजयपुरा येथे धाव घेतली.
मृत आणि जखमींच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई जाहीर करण्यासोबतच, जिल्हा प्रशासन मृतदेह आपापल्या गावी पाठवण्याची सोय करेल, असे पाटील म्हणाले. बेळगावी विमानतळ किंवा कलबुर्गी विमानतळावरून मृतदेह एअरलिफ्ट केले जातील, असेही ते म्हणाले.