नवी दिल्ली – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डीझेलच्या दरांत प्रत्येकी 35 पैशांची वाढ केली. त्यामुळे सलग चौथ्या दिवशी इंधन दरवाढ नोंदली गेली. दरवाढीच्या सत्रामुळे अवघ्या महिनाभरात पेट्रोल 8 रूपयांनी, तर सुमारे 40 दिवसांच्या कालावधीत डीझेल 9 रूपये 45 पैशांनी महागले.
सार्वजनिक कंपन्यांनी सप्टेंबरमध्ये तीन आठवडे पेट्रोल आणि डीझेलच्या दरांत कुठला बदल केला नाही. त्यानंतर सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून दरवाढीचे सत्र सुरू झाले. त्यामुळे 24 सप्टेंबरपासून आतापर्यंत डीझेल तब्बल 28 वेळा महागले. तर, 28 सप्टेंबरपासून पेट्रोलच्या दरात 25 वेळा वाढ झाली.
पेट्रोल आणि डीझेल दरांनी याआधीच देशाच्या बहुतांश भागांत 100 रूपयांची पातळी ओलांडली आहे. मुंबईत लिटरमागे पेट्रोल 115 रूपयांवर, तर डीझेल 106 रूपयांवर गेले आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 109 रूपयांवरून अधिक, तर डीझेलचा दर 98 रूपये आहे.
इंधन दर गगनाला भिडल्याने विरोधकांनी देशभरात मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी निदर्शनांचे सत्र आरंभले आहे.