मुंबई – विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीची पोटनिवडणूक 29 नोव्हेंबर रोजी होणार आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे.
रणपिसे यांचे सप्टेंबर महिन्यात निधन झाले होते. त्यांची विधान परिषदेच्या सदस्यत्वाची 6 वर्षांची मुदत 2024 मध्ये समाप्त होणार होती. या जागेवरील पोटनिवडणूकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून रविवारी करण्यात आली.
या पोटनिवडणुकीची अधिसूचना 9 नोव्हेंबर रोजी जारी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अकेरची मुदत 16 नोव्हेंबर असेल. उमेदवारी अर्जांची छाननी 17 नोव्हेंबरला केली जाईल आणि उमेदवारी अर्ज 22 नोव्हेंबरपर्यंत मागे घेतले जाऊ शकतील.
या पोटनिवडणूकीसाठीचे मतदान 29 नोव्हेंबरला होईल आणि मतमोजणी त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता होईल, असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.