मुंबई – गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राजभर एका नावाची खूप चर्चा आहे. ते नाव म्हणजे ‘गौतमी पाटील’. दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी,मोठी गर्दी आणि मोठा खर्च. यामुळे आता गौतमी आणि कार्यक्रमात राडा हे जणू समीकरणच बनत चाललं आहे. नुकतीच गौतमीचा एका ठिकाणी कार्यक्रम पार पडला यावेळी गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांना अक्षरशः लाठीचार्ज करावा लागला.
सांगलीमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होत. नेहमीप्रमाणे कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली. विठ्ठल घोडके आणि रुपाली घोडके याच्या लग्नाचा 25 वा वाढदिवस होता यानिमित्त त्यांनी गौतमीच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी घोडके परिवाराने गौतमीसोबत स्टेजवर केक देखील कापला.
गौतमीचा कार्यक्रम सुरु होताच काही तरुणांनी हुल्लडबाजी करायला सुरुवात केली. परिणामी पब्लिक बेकाबु झाली. घोषणा शिट्ट्या वाढू लागल्या. पोलिसांनी गडबड गोंधळ न घालता कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन सर्वांना केले. परंतु जमाव काही केल्या शांत बसायला तयार नव्हता. अशात पोलिसांनी हुल्लडबाजी करणाऱ्या टोळक्यांवर लाठीचार्ज करत हुल्लडबाजांना चांगलाच चोप दिला.
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वायफळेमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाला तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. गौतमीने स्टेजवर एका छोटया मुलासोबत डान्स देखील केला यावेळेसचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.