छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आता काही तासांत जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वीच अनेक नेते मंडळींकडून तर्कवितर्क लावले जात आहे. यातच आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटातील उदय सामंत हे सध्या उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
“उदय सामंत हे स्वतः उद्धव ठाकरे साहेब यांच्या संपर्कात आहेत. कारण शिंदे गटात ते सर्वात शेवटी गेले होते. त्यामुळे ते 16 मध्ये आले नाही, यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहे. यांच्या गटातील अनेक जण आता फुटणार आहेत त्यामुळे ते आमच्याकडे येऊ शकतात. काय परिस्थिती निर्माण होईल त्यावरून तेच होईल मात्र काही असो उद्धव ठाकरे यांचा मोठा विजय होईल,” असा विश्वास माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.
पुढे चंद्रकांत खैरे म्हणाले की, “सर्वोच्च न्यायलयाचा निकाल गद्दारांना धडा शिकवणारा असणार आहे. कारण त्यांनी केलेली गद्दारी ही कोणालीही मान्य नाही. आम्ही सगळे उद्धव ठाकरेंसोबत उभे आहोत. एकनिष्ठ शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत. जे गद्दार आहेत त्यांना धडा शिकवणारा आजचा निर्णय असणार आहे.”
चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरात होम हवण आणि पूजा केली आहे. त्याबाबत ते म्हणाले, “मी हिंदुत्वादी जरी असलो तरी मी देवभक्त आहे. मी कोर्टाला विनंती करू शकत नाही. मात्र मी देवाला प्रार्थना करू शकतो. राज्याचा सत्ता संघर्षाचा निकाल हा उद्धवजींच्या बाजूने लागू दे अशी प्रार्थनाही मी देवाकडे केली आहे.”