लंडन – ब्रिटनमध्ये करोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. सलग दुसऱ्या दिवशी ब्रिटनमध्ये करोनाबाधितांची उच्चांकी नोंद झाली अहे. ब्रिटनमध्ये गुरुवारी 88 हजार 376 करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यामुळे सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनबाधितांची संख्याही वाढत आहे.
मागील 28 दिवसांमध्ये ब्रिटनमध्ये करोनाबाधित असलेल्या 165 जणांचा मृत्यू झाला आहे. करोना महासाथीची सुरुवात झाल्यानंतर ब्रिटनमध्ये दुसऱ्यांदा बाधितांची उच्चांकी नोंद करण्यात आली. ब्रिटनमध्ये बुधवारी 78 हजार 610 बाधितांची नोंद करण्यात आली होती. याआधी 8 जानेवारी रोजी 68 हजार 053 बाधितांची नोंद करण्यात आली होती. त्यावेळी ब्रिटनमध्ये लॉकडाउन सुरू होता. जानेवारीत नोंदवण्यात आलेल्या आकडेवारीपेक्षा ही संख्या 10 हजाराने अधिक आहे.
करोनाचा सर्वात नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा ब्रिटनला मोठा धोका असल्याचे ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा संस्थेच्या प्रमुख डॉ. जेनी हॅरीस यांनी सांगितले. येत्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव होत असल्याने बाधितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.