इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरिक ए इन्साफ अर्थात पीटीआय पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान सध्या विविध गुन्ह्यांच्या आरोपांखाली तेथील तुरूंगात आहेत. त्या देशात पुढच्या वर्षी ८ फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार असल्यामुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. त्यातच इम्रान खान यांनाही न्यायालयाकडून थोडासा दिलासा मिळू लागला आहे. त्यांच्या वकिलांना आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना अदियाला तुरूंगात त्यांची भेट घेता येईल आणि बैठकही घेता येईल असा निर्णय इस्लामाबाद उच्च न्यायालयाने आज दिला आहे.
डॉन या तेथील माध्यमाने यासंदर्भातील बातमी दिली आहे.त्यानुसार न्यायाधीश मियांगुल हसन औरंगजेब यांनी इम्रान यांच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर वरील आदेश दिला आहे. आपल्या पक्षाचे सदस्य असद कैसर, जुनैद अकबर खान, सीनेटर औरंगजेब खान आणि आपले मित्र मोहम्मद खान व इश्तियाक मेहरबान यांच्यासह निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी बैठक घेण्याची परवानगी दिली जाण्याची मागणी इम्रान यांनी याचिकेत केली होती. तसेच आपल्या वकिलांशी चर्चा करताना त्याबाबत गोपनीयता राहावी याकरता अदियाला तुरूंग अधिक्षकांनाही निर्देश देण्याची मागणी त्यांनी केली होती.
त्यानंतर न्यायालयाने इम्रान खान यांच्या पक्षाचे अध्यक्ष गौहर खान आणि त्यांच्या वकिलांना इम्रान यांच्यासोबत तुरूंगातच बैठक घेण्याची अनुमती दिली आहे. तुरूंग अधिक्षकांच्या देखरेखीखालीच बैठक घेतली जावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पत्रकारांशी बोलताना पीटीआयचे वकील शाहीन म्हणाले की पाकिस्तान निवडणूक आयोग आणि येथील काळजीवाहु पंतप्रधान कोणाच्या निर्देशावर काम करत आहेत हे प्रत्येकाला दिसते आहे. आज पाकिस्तानातील जनता इम्रान खान यांच्यासोबत उभी असल्यामुळे निवडणूक आयोग आणि अन्य राजकीय पक्षांना आपला पराभव स्पष्ट दिसू लागला आहे.
दरम्यान, निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पाकिस्तानातील राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. रविवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत समाप्त झाली असून आता २५ ते ३० डिसेंबर या कालावधीत अर्जांची छाननी सुरू आहे.