नवी दिल्ली – देशभरात भारतीय लष्करात भरती होण्यासाठीच्या अग्नीपथ योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्यानुसार 2022 या वर्षात लष्कर, हवाईदल आणि नौदलात भरती केली जाणार आहे. अग्नीपथ योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 14 जून रोजी केली होती. देशातील तरुण पिढीला भारतीय फौजेत भरती होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देणे या योजनेचा उद्देश आहे. सुरवातीला या योजनेला विरोध झाला आणि उत्तरेकडील काही राज्यांमध्ये हिंसक आंदोलनही करण्यात आले. आता या योजनेअंतर्गत अग्नीवीरांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या योजनेला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.
अग्नीपथ योजनेअंतर्गत हवाई दलातील भरतीसाठीची नोंदणी 24 जून 2022 पासून सुरू झालेली आहे. लष्करातील भरतीच्या नोंदणीच्या तारखा जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची माहिती
· अग्निपथ योजनेची सुरवात – 14 जून 2022
· वयोमर्यादा – 17.5 ते 23 वर्षे
· पात्रता निकष – आठवी उत्तीर्ण (फक्त लष्कर भरतीसाठी), हवाई दल आणि नौदलासाठी किमान दहावी किंवा बारावी उत्तीर्ण
· वेतन – पहिल्या वर्षी सुमारे 4.76 लाख रुपये, चौथ्या वर्षी 6.92 लाख रुपये, याखेरीज भोजन, गणवेश, प्रवास भत्ता मिळणार
· सेवा निधी पॅकेज – मृत्यू झाल्यास भरपाई, अपंगत्व आल्यासही भरपाई
अग्निपथ योजनेअंतर्ग लष्कर, हवाई दल आणि नौदल भरतीसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे याची नोंद घ्यावी. अग्नीवीर जनरल ड्युटी, तांत्रिक पदे, हवाई दलातील तांत्रिक पदे, विस्फोटके, कारकून आणि स्टोअर कीपर (तांत्रिक) आणि अग्नीवीर ट्रेडसमन पदांसाठी अर्ज करू शकतात.
प्रमुख तारखा
· अधिसूचना जारी – 20 जून 2022
· अर्ज करण्याची अंतिम तारीख – जाहीर होणे बाकी आहे.
· लेखी परिक्षा – अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परिक्षेच्या तारखा जाहीर होतील.
· कुठे अर्ज करणार – @joinindian army.nic.in
अग्नीवीर भरतीसाठी पात्रता निकष प्रत्येक पदासाठी वेगवेगळे आहेत. मात्र, सर्वच पदांसाठी वयोमर्यादा सारखीच म्हणजे 17.5 ते 23 वर्षे. जनरल ड्युटीसाठी दहावी पास, दहावीला एकूण 45 टक्क्यांपेक्षा जास्त गुण आवश्यक आहेत. प्रत्येक विषयात किमान 33 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असले पाहिजेत. तांत्रिक पदे आणि हवाई दलातील तांत्रिक पदे, स्फोटके निरिक्षक पदासाठी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पीसीएम आणि इंग्रजी विषयात बारावीला पन्नास टक्के आणि प्रत्येक विषयात 40 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. ट्रेडसमनसाठी आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
24 जूनपासून अग्निपथ अंतर्गत हवाई दलातील भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. हवाई दलाकडून अद्पा एकूण रिक्त पदे आणि विविध पदांची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यासाठीची अधिसूचना 22 जून 2022 रोजी जारी करण्यात आलेली आहे. अर्ज करण्यास 24 जून पासून प्रारंभ झालेला आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 जुलै 2022 आहे. लेखी परीक्षा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात होईल. प्रत्यक्ष भरती 11 डिसेंबर 2022 रोजी होईल. @agnipathvayu.cdac.in याठिकाणी अर्ज करावा.