जबलपूर :- मध्यप्रदेशातील भाजप सरकारने शनिवारपासून लाडली बहना (लाडकी बहीण) योजनेची अंमलबजावणी सुरू केली. त्याअंतर्गत त्या राज्यातील 1 कोटी 25 लाख महिलांच्या बॅंक खात्यांमध्ये प्रत्येकी 1 हजार रूपये जमा करण्यात आले.
मध्यप्रदेशात चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. ती जवळ येऊन ठेपल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्या राज्यात महिला मतदारांची एकूण संख्या सुमारे 2 कोटी 60 लाख इतकी आहे. त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठीही राजकीय पक्षांमध्ये एकप्रकारे चुरशीची शर्यत सुरू झाली आहे. त्यातून कॉंग्रेसने मध्यप्रदेशची सत्ता मिळाल्यास महिलांना दरमहा प्रत्येकी 1 हजार 500 रूपये अर्थसहाय्य उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले.
कॉंग्रेसची ती खेळी निष्प्रभ ठरवण्यासाठी भाजप सरकारने लाडली बहना योजना सुरू केली. त्याअंतर्गत 23 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांना दर महिन्याला प्रत्येकी 1 हजार रूपये मिळतील.
प्राप्तिकर भरावा न लागणाऱ्या आणि कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रूपयांपेक्षा कमी असणाऱ्या महिला त्या योजनेच्या लाभार्थी आहेत. त्या योजनेच्या माध्यमातून जवळपास निम्म्या महिला मतदारांना खुष करण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला आहे.