कॅन्टोन्मेंट हद्दीत राज्य सरकारच्या योजना लागू करा

पुणे – राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी व विकास योजना लष्कर परिसरात राबविण्याबाबत पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड राज्य सरकारकडे मागणी करणार आहे. यासाठी बोर्डाकडून विविध योजना कॅंटोन्मेंटमध्ये लागू करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत.

 

 

बोर्डातर्फे नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावानुसार, पीडित महिलांना एकाच छताखाली सर्व प्रकारची मदत देण्यासाठी वन स्टॉप सेंटर उभारण्याचा प्रस्ताव महिला व बालविकास विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.

 

 

संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचा लाभ लष्कर भागातील नागरिकांना घेता यावा, यासाठी कियॉस्क किंवा सुविधा केंद्र उभारण्यात यावे, लष्कर भागात अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करावी, कॅंटोन्मेंट रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत करण्यात यावे, असे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती बोर्ड प्रशासनातर्फे देण्यात आली.

 

 

करोना काळात काही कॅन्टोन्मेंटवासीयांना खाजगी तसेच धर्मादाय रूग्णालयात उपचार घ्यावे लागले. मात्र महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना या भागात लागू होत नसल्याने अनेक नागरिक सवलतीच्या उपचराचा लाभ घेण्यापासून वंचित राहिल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी नुकतेच केली होती. त्यानुसार कॅन्टोन्मेंट भागात राज्य सरकारच्या योजना लागू करण्याबाबतची मागणी बोर्डाकडून केली जाणार आहे.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.