कांगारूंच्या देशात : गावसकर तुम्ही सुद्धा…

-अमित डोंगरे

समजावून सांगितल्यावर लोकांना समजले असते तर बासरी वाजवणाऱ्याने महाभारत होऊच दिले नसते. तद्वत, समजावून सांगितल्यावर समजले असते तर ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटूंनी सातत्याने स्लेजिंग कशाला केले असते. मात्र, चूक त्यांची नव्हे तर त्यांना समजावून सांगणाऱ्यांची आहे.
जसे आपण श्‍वास घेतो, अन्न खातो किंवा पाणी पितो तितक्‍याच नैसर्गिकपणे ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू स्लेजिंग करत असतात. विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी त्यांना युक्‍तीच्या चार गोष्टी सांगून असे म्हणत स्वतःचेच हसू करून घेतले आहे. त्यांचा कर्णधार टीम पेनी म्हणाला की, मला गावसकर यांच्याशी हुज्जत किंवा वाद घालण्यात रस नाही. खरे म्हणजे हे गावसकरांना इतक्‍या वर्षांनंतरही कसे कळले नाही की पालथ्या घड्यावर पाणी म्हणजे काय ते. 

सिडनी कसोटीच नव्हे तर ब्रिस्बेन कसोटीतही ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लेबुशेन व स्टिव्ह स्मिथ यांनी भारताच्या नवोदित गोलंदाजांना उद्देशून शेरेबाजी केली. अर्थात, पंचांनी सोईस्करपणे त्याकडे दुर्लक्ष केले हे वेगळे सांगायला नको. जेव्हापासून ऑस्ट्रेलियाचा संघ वेस्ट इंडिजची मक्‍तेदारी मोडून जागतिक विजेता बनला तेव्हापासूनच त्यांना पराभव सहनच होत नाही. अन्य कोणता संघ त्यांना आव्हान देतो व ते सहन केले पाहिजे ही त्यांची मानसिकताच नाही. त्यामुळे जेव्हापासून भारतीय संघ त्यांच्यावर कुरघोडी करू लागला तेव्हापासून त्यांनी भारताच्या प्रत्येक खेळाडूला उद्देशून स्लेजिंग करण्याचे धोरण आखले व तेच आजतागायत कायम आहे. फक्‍त खेळाडू बदलतात.

ऍडलेड कसोटीत जोश हेझलवूड व पॅट कमिन्सने, तर मेलबर्न कसोटीत मिशेल मार्श व नाथन लियॉनने आणि सिडनी कसोटीत कर्णधार टीम पेनीसह स्टिव्ह स्मिथने यथेच्छ स्लेजिंग केले. नेहमीप्रमाणे मैदानावरील व टीव्हीवरील पंचांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आम्ही मारल्यासारखे करतो, तुम्ही रडल्यासारखे करा या थाटाच पेनीला काही रकमेचा दंड केला गेला. त्यानेही मैदानावरील प्रेक्षकांनी केलेल्या वर्णद्वेषी टीकेसाठी नैतिक वगैरे म्हणतात ती जबाबदारी स्वीकारून माफीही मागितली. पण ब्रिस्बेन कसोटीत पुन्हा ये रे माझ्या मागल्या.

इथे स्लेजिंगचा मक्ता स्मिथने घेतला. हा माणूस फलंदाजी करत असो किंवा क्षेत्ररक्षण त्याला स्लेजिंग केल्याशिवाय करमतच नाही. चौथ्या कसोटी सामन्यातही भारतीय संघाकडून वॉशिंग्टन सुंदर व टी. नटराजन यांनी कसोटी पदार्पण केले. हे दोघे गोलंदाजी करत असताना स्मिथसह मार्नस लेबुशेननेही त्यांच्यावर दडपण टाकण्याच्या उद्देशाने शेरेबाजी केली. अर्थात, वॉशिंग्टन सुंदर त्यांच्या वरचढ निघाला. त्याने कर्णधार अजिंक्‍य रहाणेला सांगून इतके अचूक क्षेत्ररक्षण लावले व या जाळ्यात स्मिथ अगदी अलगद सापडला. असो, बाद झाल्यावरही तो शांतपणे ड्रेसिंगरुमकडे गेला नाही. जातानाही त्याने सुंदरला काहीतरी टोमणे मारलेच.

या सगळ्याबाबत गावसकर यांनी त्यांचे कान टोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावर पेनीनेही वाद घालण्यात रस नसल्याचे वक्‍तव्य करून हम नहीं सुधरेंगे हेच दाखवून दिले. त्यामुळे आता तरी गावसकरांनी हे प्रयत्न सोडावेत व गड्या आपले काम बरे या थाटात केवळ समालोचन करावे. गाढवासमोर गीता वाचून उपयोग नसतो हे त्यांनी आता तरी समजून घेतले पाहिजे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.