वडगाव मावळ – करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असला तरी आपण सर्वांनी एकत्रितपणे करोनाचा सामना करून ही लढाई जिंकूच यासाठी सर्वांनी “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेत सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी करावी, असे वक्तव्य राजेश टोपे यांनी केले.
दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, या काळात नागरिकांना त्वरित व योग्य उपचार मिळावे यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने वडगाव येथे उभारण्यात आलेल्या “कोविड-19′ मावळ तालुका बहुउद्देशीय सुविधा केंद्रातील यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे सोमवारी (दि. 21) वडगाव येथे आले होते.
या वेळी सर्वप्रथम तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात प्रशिक्षण केंद्र येथे रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला भेट दिली. तेथील सोयीसुविधा व उपचारांविषयी थेट रुग्णांशी संवाद साधून त्यांची विचारणा केली. त्यानंतर करोनाशी सामना करण्याच्या दृष्टीने उभारलेल्या “कोविड-19′ मावळ तालुका बहुउद्देशीय सुविधा केंद्रातील’ यंत्रणेचा त्यांनी आढावा घेतला.
केंद्रातील प्रत्येक कक्षांना भेटी देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेसाठी आवश्यक वैद्यकीय सामुग्री व साहित्य प्रातिनिधिक स्वरूपात नगराध्यक्ष मयूर ढोरे व नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांच्याकडे देण्यात आले.
मावळ तालुक्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या प्रतिबंधासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता केलेल्या व्यापक विविध उपाययोजनांची पाहणी करून आमदार सुनील शेळके व सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे यांचे या उपक्रमातील कामाविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले.
या दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस, मावळ व फोर्स मोटर्स, शंकरराव बा. शेळके यांच्या वतीने मावळ तालुक्यातील रुग्णांच्या मोफत सेवेसाठी दिलेल्या दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी आमदार सुनील शेळके, प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, रोटरी क्लबचे अध्यक्ष शंकरराव शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबन भेगडे, जिल्हा परिषद सभापती बाबुराव वायकर, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, राष्ट्रवादी ग्रामीण अध्यक्ष सुभाष जाधव, सुनीता काळोखे, शीतल हगवणे, विद्या भोसले, सविता मनचरे, मंजुश्री वाघ, कर्मचारी, बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.