- गुन्हे शाखा युनिट 5 ची कार्यवाही
देहूरोड – भिशीच्या नावावर फसवणूक करणाऱ्या आणि चार गुन्ह्यांत दोन वर्षांपासून फरार असणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने जेरबंद करून देहूरोड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
संजय मारुती कारले (वय 42, रा. अनिकेत अपार्टमेंट, फ्लॅट नं 05, यशवंतनगर, तळेगाव दाभाडे, मावळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी राबविलेल्या “झिरो टोलरन्स’ या मोहिमेअंतर्गत गुन्ह्यांच्या प्रतिबंध अनुशंगाने गुन्हे शाखा युनिट 5 चे यांना आदेशीत करून सूचना दिल्या होत्या.
पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे व सावन राठोड यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तळेगाव दाभाडे, देहूरोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये सोन्याची भिशीच्या नावाखाली फसवणुकीचे गुन्हे करुन फरार असणारा संजय कारले हा त्याचे राहते घरी तळेगाव दाभाडे येथे येणार असल्याने संदीप ठाकरे, मयूर वाडकर, गणेश मालुसरे, ज्ञानेश्वर गाडेकर व श्यामसुंदर गुट्टे यांचे एक शोध पथक तैनात केले.
अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांच्या आदेशान्वये पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, फारुक मुल्ला, नितीन बहिरट, भरत माने, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, गोपाळ ब्रम्हांदे व राजेंद्र कदम यांनी सापळा रचून कारले याला ताब्यात घेतले असता त्याने सोन्याचे भिसीचे नावाखाली देहूरोड व तळेगाव भागामध्ये लोकांची फसवणूक केली असल्याचे कबुली दिली.