मुंबई – बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यप सध्या त्याच्या ऑल मोस्ट प्यार या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतच अनुरागने एका वेब शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने आपल्या खाजगी आयुष्यासह विविध गोष्टींवर भाष्य केले. अनुरागने यावेळी आपल्याला सौदी पोलिसांनी केलेली अटक आणि विमानाचा किस्सा देखील सगळ्यांसोबत शेअर केला.
वेगवेगळे विषय घेऊन सिनेमा बनवणारा अनुराग नेहमीच चर्चेत असतो. मुलाखतीदरम्यान अनुरागला खराब विमान प्रवासाबाबत विचारले असता तो म्हणाला,”मी डेन्मार्कमध्ये अडकलो होतो. त्याठिकाणी काही नैसर्गिक अडथळ्यांमुळे विमान टेक ऑफ करत नव्हते. त्यामुळे मी ट्रेनने रोमला पोहचलो. मी सौदीच्या विमानाचे तिकीट काढलेले होते मात्र ते पाच तास उशिरा होते. म्हणून मी तिथल्या लाउंजमध्ये जाऊन वाईन पित बसलो त्यानंतर तसाच नशेत विमानात बसून सौदीला गेलो. अशी माहिती अनुरागने यावेळी सांगितली.
खरा किस्सा अजून पुढेच आहे. सौदीला गेल्या गेल्या अनुरागला तेथील अधिकाऱ्यांनी अटक केली कारण तो नशेत होता. त्याने कसाबसा मित्र रॉनी स्क्रूवालाला मेसेज केला. त्यानंतर काही विमान कर्मचारी आले आणि त्या अधिकाऱ्यांशी बोलू लागले. त्यानंतर तीन तासांनी कशीबशी अनुरागची तेथून सुटका झाल्याचे तो सांगतो.
गँग्ज ऑफ वासेपूर,सेक्रेट गेम्स,ब्लॅक फ्रायडे,देव डी अशा दर्जेदार कलाकृती देणाऱ्या अनुराग कश्यपचा ‘ऑल्मोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यानिमित्त अनफिल्टर विथ समदिश या शोमध्ये आपले अनेक कारनामे अनुरागने सांगितले.