बेलग्रेड – जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोवीचने अद्याप आपला तोरा कायम राखला आहे. करोनाच्या लसीचा डोस घेण्यास नकार दिल्यानंतर तसेच व्हिसा रद्द केल्यावर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्यावरही लस घ्यायची की नाही ते ठरवण्याचा मला हक्क आहे, अशा शब्दांत त्याने आपल्या वर्तणुकीचे समर्थन केले आहे.
कोणत्याही स्पर्धेपेक्षा तसेच विजेतेपदापेक्षाही माझे आरोग्य महत्त्वाचे आहे. लसीकरणाला माझा विरोध नाही, पण एकदा लसीचे सर्व डोस घेतलेले असताना केवळ नियमांमुळे अडचणीत आणले जाणे अयोग्य आहे. ऑस्ट्रेलियात मी व्हिसासाठी केलेल्या अर्जात काही चुका होत्या. मात्र, एक सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणेच मी वर्तन केले.
माझे स्टारडम मी त्यासाठी वापरले नाही. पण तरीही मला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. हे प्रकरण आता माझ्यासाठी संपलेले असून, पुढील स्पर्धांसाठी मी सराव करत आहे, असे जोकोवीचने सांगितले. लसीकरणाबाबत झालेल्या वादामुळे आता फ्रेंच ओपन आणि विंबल्डन स्पर्धेतूनही माघा घेणार का, यावर बोलताना त्याने मी कोणतीही किंमत चुकवायला तयार आहे. माझे आरोग्य माझ्यासाठी अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाचे आहे, असे सांगितले.
चाचणीचा अहवाल दाखवला होता
मी माझ्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवालही दाखवला होता. माझ्या शरीरात त्यावेळी पुरेशा अँटी बॉडीज् होत्या. हे सर्व ऑस्ट्रेलियाच्या दोन स्वतंत्र वैद्यकीय समितींनी मान्य केले होते. हेही सांगणे गरजेचे आहे की, माझे नाव त्या अर्जावर नव्हते. असो आता हे प्रकरण माझ्यासाठी संपलेले आहे, असे त्याने सांगितले.
मी लसीकरणाच्या विरोधात नाही. आज जागतिक स्तरावर प्रत्येक जण करोनाशी लढत आहे. मी माझ्या स्टारडमचा वापर ऑस्ट्रेलियात घुसण्यासाठी वापरला नाही. मला जशी सर्व सामान्य व्यक्तींना वागणूक मिळते तशीच मलाही मिळाली.
मला जी मेल मिळाली ती सगळ्या खेळाडूंनाही मिळाली होती. नियमांचे पालन करतानाच जेथे वैद्यकीय सूट शक्य होती ती वापरण्याचा मी प्रयत्न केला व अर्जही केला, असेही तो म्हणाला.