सिंधुदुर्ग – शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणात आमदार नितेश राणेंची अखेर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. या हल्ला प्रकरणात चौकशीला उपस्थित राहण्यासाठी कणकवली पोलिसांनी 21 तारखेला नोटीस बजावली होती. यावेळी मला मुद्दाम टार्गेट केले जात आहे, असा आरोपही नितेश राणे यांनी केला आहे.
अधिवेशनावेळी विधानभवनाबाहेर बोलताना, तुम्हाला जास्त विरोध केला जातो, तेव्हा तुम्ही योग्य आणि चांगले काम करत आहे असे समजायचे, मी योग्य काम करतोय, म्हणून मला टार्गेट केले जात आहे. मात्र मी गप्प बसणार नाही, मी आणखी आक्रमकतेने सरकारवर तुटून पडणार असल्याचेही नितेश राणे म्हणाले होते.
पोलीस चौकशीसाठी आमदार नितेश राणे कणकवली पोलीस स्थानकात पोहचले होते. यावेळी तब्बल पाऊण तास ही चौकशी चालली. पोलीस निरीक्षक यांच्या दालनात ही चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक, डिवायएसपी, पोलीस निरीक्षक हे पोलीस अधिकारी चौकशीवेळी उपस्थित होते. चौकशीला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले आहे. जी माहिती पोलिसांना हवी होती ती दिली असल्याचेही सांगितले.