विजयन यांचा शपथविधी सोहळा ऑनलाईन पद्धतीने व्हावा; डॉक्‍टरांच्या संघटनेची मागणी

थिरूवनंतपूरम -केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी सज्ज झाले आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर, करोना संकटाकडे लक्ष वेधून डॉक्‍टरांच्या संघटनेने त्यांचा शपथविधी सोहळा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्याची मागणी केली आहे.

विधानसभा निवडणुकीत बाजी मारत डाव्या पक्षांच्या आघाडीने केरळची सत्ता राखली. त्यामुळे विजयन पुन्हा मुख्यमंत्रिपदाची सुत्रे स्वीकारणार आहेत. त्यांचा शपथविधी 20 मे यादिवशी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्या सोहळ्याला सुमारे 700 पाहुणे उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे.

त्याचा आधार घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) केरळ शाखेने ऑनलाईन सोहळा आयोजित करण्याचे आवाहन केले. निवडणूक प्रचारावेळी करोनाविषयक नियमांचे उल्लंघन झाले. केरळमध्ये करोनाची दुसरी लाट येण्यामागे तेही एक कारण आहे.

आता गर्दी टाळून शपथविधी सोहळा ऑनलाईन झाल्यास करोनाविरोधी लढ्याविषयी महत्वाचा संदेश जनतेपर्यंत पोहचेल, अशी भूमिका त्या संघटनेने मांडली. दरम्यान, शपथविधी सोहळ्याला मोजकी उपस्थिती राहील याची निश्‍चिती करण्याचे सूतोवाच विजयन यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.