इस्त्रायलच्या गाझामधील हल्ल्यात प्रसारमाध्यमांची इमारत उद्धवस्त

गाझापट्टी -इस्त्रायलने शनिवारी गाझा शहरात केलेल्या हवाई हल्ल्यात प्रसारमाध्यमांची कार्यालये असणारी इमारत उद्धवस्त झाली. तो हल्ला म्हणजे प्रसारमाध्यमांना शांत करण्याचा प्रयत्न मानला जात आहे. त्यामुळे इस्त्रायली लष्कराची कारवाई वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.

इस्त्रायली लष्कर आणि हमास या दहशतवादी गटातील संघर्ष उफाळून आला आहे. त्यातून दोन्ही बाजूंकडून हल्ले-प्रतिहल्ले सुरू झाले आहेत. अशात इस्त्रायलने माध्यमांची कार्यालये आणि निवासी अपार्टमेंट असणाऱ्या इमारतीला लक्ष्य केले. त्या हल्ल्यात संबंधित 12 मजली इमारत जमीनदोस्त झाली.

हल्ल्याआधी इस्त्रायली लष्कराने ती इमारत खाली करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे रहिवासी आणि प्रसारमाध्यमांचे कर्मचारी इमारतीतून बाहेर पडले. त्यानंतर हल्ला झाल्याने जीवितहानी टळली. जमीनदोस्त झालेल्या इमारतीत दि असोसिएटेड प्रेस (एपी), अल्‌-जझिरा आणि इतर प्रसारमाध्यमांची कार्यालये होती. हवाई हल्ल्यात इमारत कोसळत असल्याचे चित्रण करून माध्यमांनी त्याचे थेट प्रसारणही केले. इस्त्रायलने त्या इमारतीला लक्ष्य का केले ते तातडीने समजू शकले नाही.

दरम्यान, माध्यमांच्या इमारतीवर हल्ला होण्याची घटना धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी असल्याची प्रतिक्रिया एपीकडून देण्यात आली. संबंधित इमारतीमध्ये माध्यमांची कार्यालये असल्याची माहिती इस्त्रालयला खूप आधीपासून होती. आमच्या इमारतीवर हल्ला होणार असल्याचा इशारा आम्हाला मिळाला होता. पत्रकार वेळीच बाहेर पडल्याने बचावले.

आज जे काही घडले त्यामुळे गाझातील घडामोडींची कमी माहिती जगाला मिळेल. इस्त्रायल सरकारकडून अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याशिवाय, अमेरिकी परराष्ट्र खात्याच्याही संपर्कात आहोत, असे एपीने म्हटले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.