सातारा – जिल्ह्यात “पुन्हा सुरू’ मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज नवे आदेश जारी केले. त्यानुसार पाच ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील हॉटेल, फूड कोर्टस, रेस्टॉरंट्स आणि बार्स यांना 50 टक्के पेक्षा जास्त नाही इतक्या क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये सुरू राहतील. तथापि, मेडिकल, औषधांची दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. 50 लोकांच्या मर्यादत संख्येत लग्नाशी संबंधित मेळावे, समारंभाचे आयोजन करता येणार आहे.
शासनाने राज्यातील कोविड-19 च्या अनुषंगाने दिलेल्या सुधारित सूचना व “पुन्हा सुरू’ मोहिमेंतर्गत आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यात आजपासून ते दि. 31 ऑक्टोंबरच्या रात्री बारापर्यंत नवे आदेश दिले आहेत. त्यानुसार शाळा, महाविद्यालये, तसेच चित्रपटगृहे, उद्याने पूर्वीप्रमाणेच बंद राहणार आहेत. जिल्ह्यात कोणत्या बाबींना मनाई व कोणत्या बाबींना परवानगी याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
जिल्ह्यात या बाबींना परवानगी
दि. 5 ऑक्टोंबरपासून हॉटेल, फूड कोर्टस, रेस्टॉरंट्स आणि बार्स यांना 50 टक्के पेक्षा जास्त नाही इतक्या क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी. तथापि, पर्यटन विभागाने निर्धारित केलेली आदर्श कार्यप्रणालीचे पालन बंधनकारक.
ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना कोणत्याही वेळी राज्यांतर्गत तसेच राज्याबाहेर मुक्त हालचाल करण्यास परवानगी.
सर्व रेल्वे यांना राज्यात सुरवात ते शेवटपर्यंत प्रवासाला मुभा
सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये सुरू राहतील. तथापि, मेडिकल, औषधांची दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवण्यास परवानगी. (पाचपेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तात्काळ बंद)
जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या (संपूर्ण कार्यक्रमासाठी) मर्यादत लग्नाशी संबंधित मेळावे, समारंभाचे आयोजन करण्यासाठी संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक.
अंत्यविधी यासारख्या कार्यक्रमास 20 पर्यंत (संपूर्ण कार्यक्रमासाठी) व्यक्तींना सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रम करण्यास परवानगी.
वृत्तपत्र छपाई आणि वाटप करण्यास परवानगी. (घरपोच वितरणासह)
केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर शासनाच्या अटी व शर्ती तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या दि. 27 जूनच्या आदेशानुसार सुरू ठेवण्यास परवानगी.
जिल्हयातील सर्व सेतू केंद्र, महा- इ- सेवा केंद्र व आधार केंद्र अटी व शर्तीन्वये सुरू ठेवण्यास परवानगी.
जिल्हयातील इंधन पंप, औद्योगिक आस्थापना व सर्व वैद्यकीय आस्थापना पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी.
जिल्ह्यात या बाबींना मनाई
सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टिट्यूट बंद. तथापि, ऑनलाईन, अंतराचे शिक्षणास परवानगी.
चित्रपटगृहे, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, थिएटर (मॉल्स व मार्केट कॉम्लेक्समधील), बार, सभागृह, असेंब्ली हॉल यासारख्या इतर सर्व जागा बंद.
रेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असल्यास सुरू राहिल.
सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठ्या संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद.
सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू इत्यादी सेवन करण्यास मनाई.
सर्व धार्मिकस्थळे व प्रार्थनास्थळे सर्वसामान्यासांठी बंद. तथापि, नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम संबंधित धर्मगुरु, पुजारी यांना करता येतील.