पुणे – शिवाजीनगर येथील जम्बो कोविड रुग्णालय प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांपासून पूर्ण वेतन थकवल्याचा आरोप करत नर्स आणि वॉर्डबॉय यांनी बुधवारी रुग्णालय प्रवेशद्वारासमोर “रास्ता रोको’ आंदोलन केले. या आंदोलनामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात वाहतूक कोंडी झाली होती.
जम्बो रुग्णालयाच्या “मेडब्रोज हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड’ या व्यवस्थापक कंपनीने सप्टेंबरमध्ये “बेस्ट सर्व्हिसेस’ या मनुष्यबळ पुरवठादारामार्फत तीनशेहून अधिक नर्स आणि वॉर्डबॉयची सहा महिन्यांच्या करारावर नियुक्ती केली. त्यासाठी दरमहा 35 हजार रुपये पगार निश्चित केला होता.
मात्र, कंपनीने आतापर्यंत कधीही पूर्ण पगार दिला नसल्याचा दावा आंदोलक नर्सेसनी केला.
दरमहा आतापर्यंत पंधरा ते वीस हजार रुपयेच वेतन दिले जाते. त्यातून गेल्या दोन महिन्यांपासून पगारच झालेला नाही. पगाराची मागणी केल्यावर रुग्णालय प्रशासनाकडून दमदाटी, शिविगाळ केली जाते. त्यामुळे वैतागून आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे आंदोलकांनी सांगितले.
आंदोलन करताना रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून नर्सेसचा एक गट रुग्णालयात काम करत आहे. मंगळवारपर्यंत केलेल्या कामाचे पूर्ण वेतन आम्हाला द्यावे, इथून पुढे काम करायचे की नाही, ते आम्ही ठरवू, असे आंदोलकांनी सांगितले. कराराचा कालावधी पूर्ण झाला नसतानाही पगार न देताच कर्मचारी कपात केली जात आहे. त्याविरोधात आंदोलन करत असून, महापालिका आणि राज्य सरकारने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी काही वॉर्डबॉयनी केली. दिवाळीतही रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी वेतनाच्या मागणीसाठी आंदोलन केले होते.