टोकियो – जपानमधील कुप्रसिद्ध “ट्विटर किलर’ला जपानमधील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. नऊ जणांची हत्या करून त्यांचे तुकडे करण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवल्यावर त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापैकी बहुतेकांनी सोशल मिडीयावर आत्महत्येचे विचार व्यक्त केले होते. या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता.
ताकाहिरो शिराइशी असे फाशीची शिक्षा सुनावलेल्या दोषी व्यक्तीचे नाव आहे आणि त्याला टोकियो डिस्ट्रीक्ट कोर्टाच्या ताचिकावा शाखेने शिक्षा सुनावली. लोकांची हत्या करणे, तुकडे करणे आणि मृतदेह टोकियोतील झामा भागातील आपल्या अपार्टमेंटमध्ये भरून ठेवण्याच्या गुन्ह्यामध्ये त्याला दोषी ठरवण्यात आले.
त्याच्या या विकृतीमुळेच त्याला “ट्विटर किलर’ म्हणून नाव पडले होते. शिराइशी हा 30 वर्षाचा तरुण असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. फाशीच्या शिक्षेला आव्हान देणार नसल्याचे त्याने सांगितले आहे.
अपार्टमेंटमधील शीतगृहामध्ये 8 महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह आढळल्यावर 2017 साली पोलिसांनी शिराइशीला अटक केली होती. सोशल मिडीयावर आत्महत्येचा विचार व्यक्त करणाऱ्या व्यक्तींना शिराइशी ट्विटरच्या माध्यमातून संपर्क साधत असे.
त्यांची “आत्महत्या करण्याची’ ईच्छा पूर्ण करण्यात मदत करायची तयारी तो दर्शवत असे. महिलांवर बलात्कार करून तो त्यांची हत्या करत असे. एका महिलेच्या बॉयफ्रेंडला गप्प करण्यासाठी शिराइशीने त्याचीही हत्या केली होती, असे पोलिसांनी सांगितले.
ट्विटरवर शिराइशी “हॅंगमॅन’ असे नाव वापरत असे. मृत्यूची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो आपल्या सावजाला आपल्या अपार्टमेंटमध्ये बोलवत असे. त्याने लोकांना “आत्महत्या करण्यास’ मदतच केली, असा दावा बचाव पक्षाच्यावतीने करण्यात आला. मात्र नंतर शिराइशीने आपला गुन्हा कबूल केला.
कोणाही मयत व्यक्तीची हत्या करवून घेण्याची तयारी नव्हती. त्यांच्या मृत्यूला शिराइशीच पूर्णपणे जबाबदार आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. हा गुन्हा टोकाचा क्रूर आहे. आजच्या काळात सोशल मिडीया हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अशावेळी या हत्या सत्रामुळे नागरिकांच्या मनात भीती उत्पन्न केली आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
जगभरात जपानमधील आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मध्यंतरी हे प्रमाण कमी झाले होते. मात्र यावर्षी करोनाच्या आपत्तीमुळे रोजगार बुडालेल्या अनेकांनी आत्महत्या केली आहे.