हॉंगकॉंग- लोकशाहीवादी आंदोलकांनी हॉंगकॉंगच्या विमानतळावर धरणे आंदोलन सुरू केल्यामुळे तेथील विमानसेवा सलग दुसऱ्या दिवशीही ठप्प झाली. विमानतळाच्या परिसरातच आंदोलक ठाण मांडून बसले असल्यामुळे अधिकाऱ्यांना विमान उड्डाणपूर्वीच्या सोयी प्रवाशांना पुरवणे शक्यच झाले नसल्याचे स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले.
कालपासून या आंदोलनकर्त्यांनी विमानतळावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे काल संध्याकाळची विमान उड्डाणे रद्द करावी लागली होती. आजही हजारो आंदोलक विमानतळाच्या परिसरामध्ये ठाण मांडून बसले होते. ते विमानतळाच्या परिसरात यायला सुरूवात होण्यापूर्वी विमानसेवा सुरळीत होण्याची चिन्हे दिसायला लागली होती.
मात्र आंदोलकांची संख्या वाढल्यावर विमानसेवा थांबवणे भाग पडले. पोलिसांनी निदर्शकांवर केलेल्या क्रूर लाठीमाराचा निषेध करणारे फलक या आंदोलकांनी फडकावले. तसेच हॉंगकॉंगला स्वातंत्र्य मिळण्याची जोरदार मागणीही आंदोलकांकडून केली जात आहे.
विमानतळाच्या बाहेर पडण्याच्या मार्गावर निदर्शकांनी अडथळे उभे केले. त्यामुळे प्रवासावरून आलेल्या प्रवाशांनाही विमानतळाबाहेर पडणे मुश्कील झाले. विमानाने बाहेर जाणाऱ्या प्रवाशांनाही आंदोलकांच्या गर्दीमुळे विमानतळावर प्रवेश करणे शक्य झाले नाही.
प्रवाशांचा झुंडी विमानतळाच्या बाहेरील रस्त्यांवर ताटकळत उभ्या राहिल्या होत्या. विमानतळाच्या दोन्ही टर्मिनसवरील “चेक इन’ सेवा थांबवण्यात आल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी जाहीर करून टाकले आहे. विमानतळावर प्रवेशच करू न शकलेले प्रवासी आणि आंदोलक यांच्यात काही ठिकाणी जोरदार बाचाबाचीही झाली.