#INDvWI : मालिका जिंकण्याचे भारताचे ध्येय

बरोबरीसाठी विंडीजपुढे आव्हान

स्थळ-पोर्ट ऑफ स्पेन,
वेळ- भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वा.

पोर्ट ऑफ स्पेन – दुसऱ्या सामन्यातील विजयामुळे आत्मविश्‍वास उंचावलेला भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना व मालिकाही जिंकण्यासाठी आज उतरणार आहे. टी-20 पाठोपाठ वन-डे मध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या विंडीजला मालिकेत बरोबरीसाठी खडतर आव्हान स्वीकारावे लागणार आहे.

विश्‍वचषक स्पर्धेतील दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या शिखर धवनवर संघातून विश्रांती दिली जाण्याची टांगती तलवार आहे. त्याने टी-20 मधील तीन सामन्यांत 1,23 व 3 अशा धावा केल्या होत्या तर दुसऱ्या वन-डे मध्ये तो 2 धावांवर बाद झाला होता. धवनला कसोटीच्या संघात स्थान मिळालेले नाही. मधल्या फळीतील चौथ्या क्रमांकासाठी ऋषभ पंत की श्रेयस अय्यर योग्य अशी चर्चा सुरू आहे.

पंतने तिसऱ्या टी-20 लढतीत संघास विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. अय्यरने दुसऱ्या वन-डेमध्ये 71 धावांची खेळी केली होती. याच सामन्यात शानदार शतक करणारा कर्णधार विराट कोहलीकडून आजही दमदार खेळी अपेक्षित आहे. त्याच्याबरोबरच रोहित शर्मा याच्या कामगिरीबाबत उत्कंठा आहे. दुसऱ्या वन-डेमध्ये चार बळी घेणारा भुवनेश्‍वरकुमार तसेच मोहम्मद शमी, कुलदीप यादव यांच्यावर पुन्हा भारताच्या गोलंदाजीची भिस्त आहे. सहसा विजय मिळविणाऱ्या अकरा खेळाडूंमध्ये बदल केला जात नाही. तरीही शमीला विश्रांती दिली जाण्याची शक्‍यता असून त्याच्या जागी नवदीप सैनीला संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे.

लागोपाठ पराभवामुळे दडपणाखाली खेळणाऱ्या विंडीजला आज सर्वोत्तम कौशल्य दाखवावे लागणार आहे. त्यादृष्टीनेच फलंदाजीत शाय होप, शिमोरन हेटमेयर, निकोलस पूरन यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. पहिल्या व मधल्या फळीतील फलंदाजांमध्ये सातत्याचा अभावच दिसून आला आहे.

गोलंदाजीत घरच्या मैदानावर व वातावरणाचा फायदा घेण्यात त्यांच्या गोलंदाजांना अपयश आले आहे. शेल्ड्रॉन कॉट्रेल, ओशाने थॉमस, कार्लोस ब्रेथवेट यांच्याकडून आज प्रभावी कामगिरी अपेक्षित आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्‍वरकुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.

वेस्ट इंडिज – जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, एविन लुईस, शाय होप, शिमोरन हेटमेयर, निकोलस पूरन, रोस्टोन चेस, फॅबियन ऍलन, कार्लोस ब्रेथवेट, किमो पॉल, शेल्ड्रॉन कॉट्रेल, ओशाने थॉमस, केमार रोच.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×