पुणे – जिल्ह्यातील प्रत्येकाला पक्के घर मिळण्यासाठी महाआवास अभियान राबविण्यात येत असून त्यांतर्गत विविध उपक्रम राबविण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमध्ये घरकुलाची प्रतिकृती (डेमो हाऊस) उभी केली जाणार आहे. पंचायत समितीच्या आवारात किंवा सार्वजनिक जागेवर याची उभारणी केली जाईल.
प्रत्येक पंचायत समितीमध्ये घरकुलांसाठी जागा निश्चित करण्यापासून त्याचा खर्च या सर्वांचे वेळापत्रक तयार करून प्रत्येक गटविकास अधिकाऱ्यांना पाठवले आहे. पुढील 45 दिवसांमध्ये ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
यामध्ये जागा निश्चित केल्यानंतर प्रस्ताव तयार करून समितीला पाठविण्यात येणार आहे. पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव छाननी निवड समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी प्रस्ताव येईल आणि निविदा काढण्यात येणार आहेत.
दरम्यान, सध्या अभियान राबविण्यासाठी जिल्हापातळीवर कार्यशाळा झाल्या असून, तालुकास्तरीय कार्यशाळा आणि ग्रामस्तरीय कार्यशाळा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून घेण्यात येत आहेत.