नवी दिल्ली- सध्याच्या परिस्थितीत रिटेल स्टोअरवर गर्दी होऊ नये याकरिता काही राज्यात अन्न पुरवठा करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी नागरिकांना घरपोच मद्य पुरवठा सुरू केला आहे. सध्या झारखंड राज्यातील रांची शहरात ही योजना यशस्वी सुरू झाली असून इतर शहरात योजना लवकरच लागू होणार असल्याचे एका कंपनीने म्हटले आहे.
त्याचबरोबर ही कंपनी इतर अनेक राज्याबरोबर अशा प्रकारे पुरवठा करण्याबाबत चर्चा करीत आहे. सर्व नियमांचे पालन करून स्वच्छतेची काळजी घेत हा पुरवठा केला जात असल्याचे स्विगी या कंपनीचे उपाध्यक्ष अनुज राठी यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आम्ही जी व्यक्ती मद्य घेण्यासाठी पात्र आहे याची शहानिशा करून सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळून हे काम करीत आहोत. यामुळे करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.