मुंबई – ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राचे नाव इतिहासाच्या पानात कायमचे नोंदवले गेले आहे. चोप्राने पुरूषांच्या भालाफेकीत जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. अशी कामगिरी करणारा तो भारतातील पहिलाच खेळाडू ठरला. दिग्गज अॅथलीट अँडरसन पीटर्सला मागे टाकत चोप्राने ही कामगिरी केली.
नीरज चोप्राने 2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. अॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्यानंतर चोप्राने 87.58 मीटर अंतरावर भाला फेकून भारतीय क्रीडा इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले.नीरज चोप्राने ऑलिम्पिकमधून मिळालेले यश इतर स्पर्धांमध्येही कायम ठेवले. झुरिचमधील प्रतिष्ठित डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने 89.63 मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले.
अशा प्रकारे नीरज चोप्रा नंबर-१ बनला
चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये 88.67 मीटर भाला फेक करून स्पर्धा जिंकली. या कामगिरीमुळे चोप्राला क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळाला. याच स्पर्धेत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता जाकुब वडलेच दुसऱ्या स्थानावर होता. त्याने 88.63 मीटर अंतरावर भाला फेकला. वर्ल्ड चॅम्पियन अँडरसन पीटर्सने 85.88 मीटर फेक करून तिसरे स्थान पटकावले.
ही स्पर्धा जिंकल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नीरज चोप्रा म्हणाले की, 2024 मध्ये होणार्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हे सातत्य राखण्याचे त्यांचे ध्येय आहे. चोप्रा पुढे म्हणाल, “हा खूप कठीण विजय होता, पण मी आनंदी आहे. ही माझ्यासाठी चांगली सुरुवात आहे. मला आशा आहे की पुढील स्पर्धांमध्ये नंबर-1 राहीन आणि या मोसमात आणखी चांगली कामगिरी करत राहीन.