पबेशावर – पाकिस्तानमध्ये एक हिंदू महिला प्रथमच निवडणूक लढवणार आहे. दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे अशांत बनलेल्या खैबर पख्तुन्वा प्रांतातील निवडणूक लढवण्याचा निर्णय डॉ. सविरा प्रकाश या हिंदू महिलेने घेतला आहे. व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्रात सक्रीय असलेल्या डॉ. सविरा प्रकाश यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. खैबर पख्तुन्वा प्रांतातील बुनेर जिल्ह्यातल्या पीके-२५ या खुल्या वर्गाच्या मतदार संघातून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, असे त्यांचे वडील ओम प्रकाश यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
डॉ. सविरा प्रकाश यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या तिकीटावर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पीके- २५ हा खैबर पख्तुनख्वाच्या विधानसभेचा मतदार संघ खुल्या वर्गातील महिलांसाठी राखीव आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या संसद सदस्या रुबिना खालिद यांच्या विनंतीवरून डॉ. प्रकाश यांनी निवडणूकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बुधवारी बुनेर जिल्ह्यात पीपीपी पक्षाची मोठी सभा होणार आहे. त्यावेळी डॉ. प्रकाश यांना पक्षाचे तिकीट अधिकृतपणे देण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने अलिकडेच खुल्या मतदार संघांमध्ये महिलांसाठी ५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डॉ. प्रकाश यांनी लिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
डॉ. सविरा प्रकाश राजकारणामध्ये सक्रीय होण्याबाबत गांभीर्याने प्रयत्नशील आहेत. सर्वसाधारण आणि राखीव मतदार संघातून त्या ८ फेब्रुवारीची निवडणूक लढवणार आहेत, असे ओम प्रकाश यांनी सांगितले. ओम प्रकाश हे स्वतः डॉक्टर आहेत. पाकिस्तान पीपल्स पार्टीमध्ये ते गेल्या ३५ वर्षांपासून सक्रीय आहेत.
डॉ प्रकाश या बुनेर जिल्ह्यातून प्रांतीय निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या पहिल्या महिला आहेत, असे कौमी वतन पार्टीचे स्थानिक राजकीय नेते सलिम खान यांनी सांगितले.
गरीब आणि महिलांच्या हक्कांसाठी राजकारण…
प्रकाश यांनी २०२२ मध्ये एबोटाबाद इंटरनॅशनल मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले आणि त्या बुनेरमधील पीपीपी महिला शाखेच्या सरचिटणीस देखील आहेत.आपल्या वडिलांप्रमाणे गरीब महिलांना आपले न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी आणि आपले हक्क मिळवण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यावर आपला भर असेल, असेही त्यांनी सांगितले.