श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी सुरक्षा दलांनी एका वॉन्टेड दहशतवाद्याचा खात्मा केला. तो हिज्बुल मुजाहिदीन संघटनेचा सदस्य होता. शोपियॉं जिल्ह्यात दहशतवाद्याचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी शोधमोहीम हाती घेतली.
त्यावेळी जवानांना पाहून दहशतवाद्याने गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये हिज्बुलचा सदस्य उमर इशफाक मलिक उर्फ मुसा मारला गेला.
सुरक्षा जवान आणि नागरिकांवर मागील काही काळात दहशतवादी हल्ले झाले. त्यातील काही हल्ल्यांत मुसा सामील होता. त्याशिवाय, युवकांना दहशतवादाच्या मार्गावर नेण्यासाठीही तो सक्रिय होता. त्यामुळे मुसाचा खात्मा सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे. त्याशिवाय, मुसा मारला जाणे हिज्बुलसाठी मोठा तडाखा आहे.