वाघोली ( प्रतिनिधी) : वाडेबोल्हाई (तालुका हवेली) येथे एका निराधार बेवारस महिलेस तिची तात्काळ विचारपूस करून तिची आरोग्य तपासणी करून तिला माहेर संस्थेत तिला दाखल करून लोणीकंद पोलिसांनी माणुसकीचे अनोखे दर्शन घडविले आहे.
सद्या वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना सगळीकडे हाहाकार माजलेला असताना पोलिसांमधील आणखी एका माणुसकीचे दर्शन घडले आहे. मौजे वाडे बोल्हाई ग्रामपंचायत कार्यालय यांनी वाडे बोल्हाई गावचे हद्दीत एक बेवारस महिला (वय अंदाजे 50 वर्षे) गावात फिरत आहे, अशी माहिती पत्राद्वारे कळविले होते. लोणीकंद पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी तात्काळ दखल घेतली. व त्यांच्या पोलीस स्टाफला सदर ठिकाणी जाऊन सदर महिलेची संपूर्ण व्यवस्था करणेबाबत आदेश दिल्याने पोलीस स्टाफने तात्काळ रवाना होऊन सदर महिलेकडे चौकशी केली.
महिला तिचे नाव सांगू शकत नव्हती, तसेच तीची भाषा समजून येत नव्हती. म्हणून त्या महिलेस महिला पोलिस शिपाई मोटे व वाडे बोल्हाई पोलीस पाटील सुषमा चौधरी यांचे मदतीनें ताब्यात घेऊन वाडे बोल्हाई प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेले. डॉ. सचिन सूर्यवंशी यांनी सदर महिलेची कोविड तपासणी केली असता ती निगेटिव्ह आली आहे. म्हणून सदर महिलेकडे उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने तसेच ती निराधार असल्याने त्या महिलेस रिपोर्ट सह माहेर संस्था, मांजरी खुर्द यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
“माहेर संस्था मांजरी खुर्द ही संस्था गेल्या 25 वर्षांपासून निराधार वृद्ध महिला, मुली यांना आपल्या मदतीचा हात देऊन एक पुण्याचं काम करीत आहेत. व्यवस्थापक वर्षा लोणकर, सचिन पिसे, परिचारिका निकिता सोनवणे यांनी देखील मोलाची मदत केली आहे तसेच लोणीकंद पोलिसांनी देखील माणुसकीचे अनोखे दर्शन घडवून एक आदर्श उभा केला आहे”.
– बाळासाहेब सातव पाटील (गवळी) (वरिष्ठ उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हवेली तालुका)
सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक गुन्हे विनायक वेताळ यांच्या मार्गर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे, पो. हवा. बाळासाहेब सकाटे, ऋषीकेश व्यवहारे, राणी मोटे, पो. हवा. बापू जाधव यांनी पोलीस मित्र दर्शन चौधरी व पोलीस पाटील सुषमा चौधरी यांचे मदतीने केली आहे.