पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे शहरातील महामार्गांबरोबरच सर्वच रस्त्यांवर पाणी साचले होते.
पावसाने शहराच्या विविध भागांत लावलेल्या दमदार हजेरीने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी दुचाकीस्वार व नागरिकांना पुल, बसथांबे व दुकानांमध्ये धाव घ्यावी लागली.
शहराच्या विविध सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. तर रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना दुचाकीस्वारांचे मोठे हाल झाले. तर अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली.
शहरात जवळपास सर्वत्रच कोणत्या ना कोणत्या कारणाने खोदकाम सुरु आहे. पावसाळा सुरु होण्यापुर्वी ही कामे मार्गी लावण्याचे महापालिका प्रशासनाच्या सूचना आहेत. मात्र, ही कामे वेळेत उरकली नसल्याने नागरिकांना चिखल आणि खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. विकासकामाकरिता खोदलेल्या खडड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने काही ठिकाणी काम दुपारनंतर बंद ठेवावे लागले.