पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभागरचनेवर 5667 हरकती प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींवर शुक्रवारी (दि. 21) ऍटो क्लस्टरला सुनावणी घेण्यात येणार आहे.
प्रभाग रचनेच्या हरकतींवर सुनावणीसाठी सहकार आयुक्त अनिल कवडे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर हरकती आल्यामुळे निवडणूक विभागाने सुनावणीसाठी नियोजन केले आहे. एका प्रभागासाठी अनेक हरकती आल्याने त्यांना एकाच वेळी सुनावणीसाठी बोलविण्यात येणार आहे.
त्यासाठी प्रभागानुसार आठ विभागात विभागणी केली आहे. त्यानुसार टप्याटप्याने सुनावणी देण्यात येणार आहे. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी विहीत नमूद करून विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास 2 मार्चला पाठविणार असल्याचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.