हरियाणाच्या झज्जरमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. एका ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना चिरडले. यामध्ये तीन मजुरांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. झज्जर जिल्ह्यातील टोल प्लाझासमोर कुंडली-मानेसर-पलवल एक्स्प्रेसवेवर हा अपघात झाला आहे. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाचे अचानक नियंत्रण सुटले, त्यानंतर तो रस्त्यावरून फुटपाथवर गेला. या फुटपाथवर अनेक मजूर झोपले होते. त्यावेळी हा ट्रक या मजुरांना चिरडत पुढे निघून गेला व उलटला. यामध्ये फुटपाथवरील तीन मजुरांचा जीव गेला तर 11 जण जखमी झाले. जखमीपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, 10 जखमींना पीजीआय रोहतकमध्ये पाठवण्यात आले आहे, तर एका जखमी मजुराला बहादुरगडमधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्व मृत आणि जखमी मजूर या एक्स्प्रेस वेवर दुरुस्तीचे काम करत होते. काम संपल्यावर सर्वजण थकून रस्त्याच्या कडेला झोपले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.