नवी दिल्ली : परिस्थिती कशीही असली अन् मनात काही करण्याची जिद्द असेल तर यशाला गवसणी घालता येतेच. अशीच एक गवसणी एका लेकीने घातली आहे, जिने अनेक अडचणींशी लढा देऊन सरकारी अधिकारी पद मिळवले आहे. बिहार लोकसेवा आयोगाने BPSC च्या 66 व्या एकत्रित स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर केला. यात अनेक टॉपर्सपैकी मुलींसह एक मुलगी होती ती म्हणजे जुही कुमारी. हे यश तिच्या साठी आणि तिच्या कुटुंबियांसाठी खूप खास आणि प्रेरणादायी आहे.
बीपीएससीच्या निकालामुळे बिहारमधील सारण जिल्ह्यातील मधुरा खुर्द येथील रहिवासी जुहीच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. जुहीला 307 वी रँक मिळाली आहे. यानुसार ती आता आरडीओ म्हणजेच ग्रामीण विकास अधिकारी बनली आहे. हा निकाल जाहीर झाल्यापासून तिच्यावर आणि तिच्या कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. जुही कुटुंबात सर्वात लहान आहे. तिला दोन मोठ्या बहिणी आणि एक भाऊ आहे.
जुही कुमारीचे वडील कांदे आणि बटाटे विकतात. बटाटे-कांदे विकून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते आपल्या धाकट्या मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा प्रयत्न करत होते. त्याचबरोबर मुलीला प्रत्येक पाऊलावर आधार देऊन ते प्रोत्साहन देत. माध्यमांशी बोलताना जुहीच्या वडिलांनी, ‘मला मुलीच्या यशाचा अभिमान आहे असे त्यांनी सांगितले. दरम्यान, जुहीने मधौरामध्ये राहून इंटरमिडिएटपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी छपरा येथून ग्रॅज्युएशन केलं.
मिळवलेल्या यशाबद्दल जुहीने सांगितले की, ती यापूर्वी दोनदा मुख्य परीक्षेत नापास झाली होती, पण हिंमत हरली नाही. त्यानंतर चांगले दिवस आले. तिला तिसर्या प्रयत्नात यश तर मिळालेच पण 307 वी रँकही मिळाली. जुहीची बिहार सरकारमध्ये ग्रामीण विकास अधिकारी पदासाठी निवड झाली आहे. BPAC ने निकालाच्या अधिसूचनेत माहिती दिली होती की एकूण 1,768 उमेदवार या व्हिवा-व्होस चाचणी/मुलाखतीमध्ये उपस्थित होते, तर 70 गैरहजर राहिले.