ए…काप्या रे…जरा ढील दे रे …नगर शहराने लुटला पंतगबाजीचा आनंद
नगर – मकरसंक्रांतीनिमित्त बुधवारी नगरच्या आकाशात रंगीबेरंगी पतंग उत्सव पाहण्याचा आनंद लुटता आला. मकरसंक्रांतीला सारे आकाशच रंगबिरंगी ठिपक्यांनी रंगलेले असते. संक्रांत दरवर्षी साधारण 14 जानेवारीला असते. यंदा ती 15 जानेवारीला आली आहे. मकरसंक्रांतीला शनिवार किंवा रविवार आला की उत्साहाला उधाण असते.
या वर्षी बुधवारी संक्रांत आहे. बहुतांश शाळांना सुटी असल्याने बच्चे कंपनी जोशात आहे, मोठ्यांना मात्र या आनंदोत्सवासाठी सुटी घ्यावी लागू शकते. अनेकांनी घराच्या गच्चांवर तयारी करून ठेवली आहे. डीजे आणि संगीताच्या तालावर ‘ढील दे दे रे’ असे म्हणत, प्रत्येकजण पतंग उडविण्याचा आनंद घेणार आहे. ‘ओ काट…’ असे सतत दिवसभर ऐकू येणार आहे.
अनेक भागात ‘ओ-काट’ असे ओरडण्यासाठी माइकची व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभर पतंगांच्या दुकानांमध्ये गर्दी दिसत होती.
मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा पतंगीचा उत्साह तसा कमी दिसतो आहे. नायलॉन मांजावर आलेल्या संक्रांतीमुळे हा उत्साह कमी झाला आहे. पूर्वी पतंगीसाठी खास मांजा घरीच बनवला जायचा.
काचेची भुकटी करून आठ-पंधरा दिवस आधीच वस्ती- वस्तीत मांजा घोटला जायचा. पण काही वर्षांपूर्वी नायलॉन मांजा बाजारात आणला आणि पारंपरिक मांजा जवळपास हद्दपार झाला. नायलॉन मांजा प्लॅस्टिकपासून तयार होत असल्याने तो लवकर तुटत नाही आणि कुजून नष्ट होत नाही.
मकरसंक्रांतीनिमित्त घरोघरी गुळाच्या पोळ्यांचा बेत होता.शहरातील माळीवाडा,दिल्ली दरवाजा,दाळमंडई येथील विठ्ठल मंदिरात सुवासिनींनी ओवसण्यासाठी गर्दी केली होती. सायंकाळी घरोघरी तिळगूळ घ्या,गोड गोड बोला असा संदेश देत संक्रांतीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण होत होती.