संस्कृती जोपासणारी वानवडीची अपंग कल्याणकारी शिक्षणसंस्था

पुणे – वानवडी येथील अपंग कल्याणकारी शिक्षणसंस्था व संशोधन केंद्रात दरवर्षी भारतीय संस्कृतीची जोपासना व्हावी, या उद्देशाने संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. तसेच संस्थेने व्यवसायाभिमुखता जोपासल्यामुळे दिव्यांगांच्या कलागुणांना वाव मिळत आहे, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष ऍड. मुरलीधर कचरे यांनी दिली.

ऍड. कचरे म्हणाले, आषाढी एकादशीनिमित्त संस्थेकडून बालदिंडीतून सामाजिक विषयावर प्रबोधनाचा जागर करण्यात आला. पहिली ते सातवीच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सामाजिक विषयावर प्रबोधन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिकमुक्‍त परिसर, झाडे लावा, झाडे जगवा, असा संदेश दिला. बालदिंडीचे नियोजन मुख्याध्यापिका शिवानी सुतार, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी केले.

अपंग कल्याणकारी शिक्षण संस्था गेल्या 60 वर्षांपासून वारीची परंपरा राबवित आहे. वर्षभर आपल्या संस्कृतीची माहिती आणि परंपरा मुलांमध्ये वृद्धिंगत करता यावी, या उद्देशाने संस्था नेहमीच अग्रेसर आहे. तसेच अपंगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहे. दरवर्षी गणेशोत्सव, होळी, रंगपंचमी, गुरूपौर्णिमा आदी उत्सव संस्थेत राबविले जातात. दीपावलीत विद्यार्थ्यांना व्यावसायाभिमुख शिक्षण दिले जात आहे. तसेच त्यांनी बनविलेल्या आकाशकंदिलाची विक्री करण्यासाठी शहरातील विविध कंपन्यांत प्रदर्शन भरविले जात आहे. याला प्रतिसाद मिळाला आहे. उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांच्या व्यक्‍तिमत्त्व विकासावर भर दिला जातो.

संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्थेचे संचालक मंडळ, शिक्षक, कर्मचारी झोकून देऊन काम करीत आहे. तसेच विविध उपक्रम राबवून शिक्षण दिले जात आहे. संस्थेने विद्यार्थ्यांना शिक्षण देताना स्वावलंबनाचे धडे दिले जात आहेत. त्यातून दिव्यांग विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडल्यानंतर आत्मविश्‍वासाने स्पर्धेला सामोरे जावा, हा संस्थेचा हेतू साध्य झाला आहे. संस्थेत महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार राज्यांतील दिव्यांग विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. आतापर्यंत सुमारे तीन ते चार हजार विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. विनामूल्य प्रवेश, निवासी वसतिगृह, विद्यार्थ्यांवर वैयक्‍तिक लक्ष, तसेच शैक्षणिक सुविधा दिल्यामुळे राज्यात संस्थेने आदर्श निर्माण केला आहे, असे ऍड. कचरे यांनी आवर्जून नमूद केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)