ओटावा (कॅनडा) :- भारतात स्थानिक क्रिकेटमध्ये अतरंगी पुरस्कार मिळालेले यापूर्वीही आपण पाहिले आहे. महाराष्ट्रातील उरणजवळच्या एका खेड्यात तर मालिकावीर पुरस्कार जिंकलेल्या खेळाडूला चक्क एक मेंढी बक्षीस म्हणून देण्यात आली.
हे सर्वच मागे टाकत कॅनडातील एका प्रथम श्रेणीतील टी-20 लढतीत मालिकावीर पुरस्कार मिळवलेल्या शेरफन रुदरफोर्ड या खेळाडूला पुरस्कार म्हणून चक्क अमेरिकेत अर्धा एकर जमीन बक्षीस म्हणून देण्यात आली.
येथे झालेल्या ग्लोबल टी-20 स्पर्धेत मालिकावीर ठरलेल्या रुदरफोर्डला हे आश्चर्यकारक बक्षिस मिळाले ते देखील वेस्ट इंडिजचे महान कर्णधार क्लाईव्ह लॉईड यांच्या हस्ते. ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू डीन जोन्स यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो.
ब्रॅम्पटन झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मॉंट्रेअल टायगर्स संघाने सर जग्वार्स संघाला 5 गडी राखून पराभूत केले. जॅग्वार्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 130 धावा केल्या. त्यात जतिंदर सिंगने 56, मोहम्मद हॅरिसने 23 आणि अय्यान खानने 26 धावा करत त्याला चांगली साथ दिली.
मॉंट्रेअल संघाने रुदरफोर्डच्या नाबाद 38 धावांच्या खेळीच्या बळावर हा सामना जिंकला. ख्रिस लिनने 31 धावा केल्या. रुदरफोर्डला सामनावीर तसेच स्पर्धेत 220 धावा केल्याबद्दल मालिकावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले.
रुदरफोर्ड हा जगभरात सुरु असलेल्या टी-20 लीग स्पर्धा खेळतो. आयपीएल स्पर्धेत रुदरफोर्ड दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांकडूनही खेळला आहे. त्याने वेस्ट इंडिजकडून 6 सामनेही खेळले आहेत.
अतरंगी पुरस्कारांचा इतिहास..
ढाका प्रीमिअर लीग स्पर्धेत सामनावीर ल्यूक राईटला ब्लेंडर तर इयॉन मॉर्गनला चक्क प्रेशर कुकर देण्यात आला होता. श्रीलंका दौऱ्यातील कामगिरीबद्दल भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला एक मिनीट्रक देण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज झाय रिचर्डसनला बूटांच्या लेस आणि बॅटची ग्रिप देण्यात आली होती. कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये अँटॉन डेव्हविचला स्नॅक गिफ्ट हॅम्पर देण्यात आले होते.