इस्लामाबाद – जमात उद दावाचा म्होरक्या, मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड, लष्कर ए तोयबाचा संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या हाफिज सईद आणि त्याच्या संस्थांच्या पाच प्रमुख नेत्यांची बॅंक खाती पाकिस्तान सरकारने खुली केली आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीने मंजूरी दिल्यानंतर पाकिस्तान सरकारने ही खाती खुली केली आहेत. एका इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाने यासंदर्भातील वृत्त शनिवारी प्रसिद्ध केले आहे.
जमात उद् दावाच्या ज्या अन्य नेत्यांची बॅंक खाती खुली करण्यात आली आहेत, त्यामध्ये अब्दुल सलाम भुट्टावी, हाजी एम अशर्रफ, याह्या मुजाहिद आणि जफर इक्बाल यांचा समावेश आहे. या सर्वांना संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने दहशतवादी म्हणून घोषित केलेले आहे.
हे सर्वजण दहशतवादाच्या अर्थसहाय्याच्या वेगवेगळ्या प्रकरणात सध्या लाहोर कारागृहात 1 ते 5 वर्षांपर्यंतची शिक्षा भोगत आहेत. त्यांच्याविरोधातील ही प्रकरणे पंजाब दहशतवाद विरोधी विभगाने दाखल केलेली आहेत. या सर्वांनी स्वतंत्रपणे संयुक्त राष्ट्रामध्ये आपली बॅंक खाती खुली करण्यासाठी अर्ज केलेला होता. आपला कौटुंबिक खर्च भागवण्यासाठी ही खाती खुली करण्यात यावा, अशी मागणी या सर्वांनी केलेली होती.
आम्ही संयुक्त राष्ट्राकडे अपील करणार नव्हतो. मात्र कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी ही बॅंक खाती खुली होणे आवश्यक होते. त्यादृष्टीने आम्ही संयुक्त राष्ट्राकडे अपील केले होते, असे यापैकी एका नेत्याने सांगितले.
या नेत्यांचे उत्पन्न आणि आर्थिक स्रोतांबाबत पाकिस्तान सरकारनेही संयुक्त राष्ट्राला माहिती दिली होती. ही माहिती या नेत्यांच्या सुरक्षा परिषदेला बॅंक खात्यांच्या क्रमांक आणि अन्य तपशीलासह पुरवण्यात आली होती. त्यानंतर या खात्यांवरील निर्बंध उठवण्याला मंजूरी देण्यात आली.