हडपसर-पुरंदर विमानतळ मेट्रो मार्ग!

“पीएमआरडीए’च्या सर्वंकष वाहतूक आराखड्यात प्रस्ताव


केंद्र सरकारच्या शहर विकास विभागाकडे पाठविला अहवाल

पुणे – पुरंदर येथे प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणे अधिक सोयीस्कर आणि वेगवान होण्यासाठीचा विचार शासन स्तरावर सुरू आहे. त्यासाठी हडपसर ते पुरंदर मधील प्रस्तावित विमानतळ असा सुमारे 33 किलो मीटर लांबीचा मेट्रो मार्ग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने “सर्वंकष वाहतूक आराखड्यात ‘ प्रस्तावित केला आहे. केंद्र सरकारच्या शहर विकास विभागाकडे पाठविण्यात आलेल्या अहवालात हा मार्ग नव्याने प्रस्तावित केला आहे.

“पीएमआरडीए’ने सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्याचे कामे एल ऍन्ड टी या कंपनीला दिले आहे. या कंपनीकडून पहिल्या टप्प्यांत दोन हजार चौरस किलोमीटरच्या परिसरातील वाहतुकीचा अभ्यास करून “पीएमआरडीए’ला आराखडा सादर केला होता.

“पीएमआरडीए’कडून सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर या दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. भविष्यातील गरज लक्षात घेऊन हा मार्ग हडपसरपर्यंत वाढविणे, पुणे महापालिकेने हाती घेतलेला वनाज ते रामवाडी मेट्रो प्रकल्प वाघोलीपर्यंत नेणे, पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्ग हडपसरपर्यंत वाढविणे याशिवाय सहा ते आठ नवीन मेट्रो मार्ग या अहवालात नव्याने सुचविण्यात आल्या आहेत. हा अहवाल “पीएमआरडीए’कडून केंद्र सरकारच्या शहर विकास विभागाकडे अंतिम मान्यतेसाठी गेल्या नोव्हेंबरमध्ये पाठविण्यात आला होता. या विभागाने त्यात काही प्रमाणात त्रुटी काढून सुधारीत अहवाल पाठविण्याच्या सूचना “पीएमआरडीए’ला दिल्या होत्या. त्या त्रुटी दूर करून हडपसर ते पुरंदर येथील नियोजित विमानतळ दरम्यान 33 किलोमीटर दरम्यान मेट्रो मार्गाचा समावेश त्यामध्ये नव्याने करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.