- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
- तब्बल 36 लाखांचा माल हस्तगत
- परप्रांतिय ट्रक-क्लिनरला बेड्या
वडगाव मावळ – देशात लॉकडाऊन असताना जीवनावश्यक वस्तू वाहतूक विक्री सोडून अन्य वाहतूक व उद्योग कडक बंद पाळला जातोय. मात्र कंटेनरच्या दर्शनी काचेवर’ अत्यावश्यक सेवा, “लाईफ सेव्हर मेडिसीन’ असा खोटा पास लावून त्यामधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला तंबाखूजन्य पान मसाला व गुटखा याची पुणे ते मुंबई अशी द्रुतगती मार्गाने वाहतूक उघडकीस आली आहे. या प्रकरणी कंटेनर चालक व क्लिनरवर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी (दि. 8) रात्री उशिरा वडगाव (ता. मावळ) येथे कारवाई केली. या कारवाईत कंटेनरसह तंबाखूजन्य पानमसाला, गुटखा असा 36 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. मावळ तालुक्यात लॉकडाऊनमध्ये प्रतिबंध असलेला तंबाखुजन्य पानमसाला व गुटखा चढ्या भावाने खुलेआम विक्री होत होती.
कंटेनर चालक नारायणसिंग धनसिंग चौहान (वय 39, रा. बांगडी, ता. रायपूर, जि. पाली, राजस्थान) आणि क्लिनर महेंद्रसिंग लक्ष्मणसिंग चौहान (वय 28, रा. सिलीया खेडा, ता. देवार, जि. अजमेर राजस्थान असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.
पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चालक नारायणसिंग चौहान व क्लिनर महेंद्रसिंग चौहान त्यांच्या कंटेनरच्या कंटेनर (एच. आर. 38 झेड 9461) दर्शनी काचेवर अत्यावश्यक सेवा, लाईफ सेव्हर मेडीसिन’ असा खोटा पास लावला.
त्यामधून महाराष्ट्र शासनने प्रतिबंध केलेला तंबाखुजन्य पानमसाला व गुटखा याची मुंबई ते पुणे अशी द्रुतगती मार्गाने वाहतूक सुरू आहे. अशी गुप्त माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय जगताप, पोलीस कर्मचारी प्रकाश वाघमारे, राजु पुणेकर, अक्षय नवले आदींनी त्या कंटेनरचा पाठलाग केला.
पोलीस पाठलाग करीत असताना चालकाने कंटेनर लोणावळा, सोमटाणे असा चकवा दिला. तसेच वडगाव हद्दीतील स्टार वजन काटा येथून पळून जात असताना त्या कंटेनर चालकाकडे चौकशी केली. संशय आल्याने तपासणी केली असता त्यामध्ये पाठीमागे तांदळाची पोती ठेऊन आतमध्ये 36 लाख रूपये किमंतीचा राजनिवास नावाच्या गुटख्याची एकूण 30 हजार पॉकेट व 15 लाख रुपये किमंतीचा कंटेनर असा एकूण 51 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय जगताप, पोलीस कर्मचारी प्रकाश वाघमारे, राजु पुणेकर, अक्षय नवले आदींनी ही कारवाई केली. तसेच नाकाबंदीच्या ठिकाणी बंदिस्त माल वाहतूक कंटेनर यांची तपासणी करण्याचे आदेश दिले. आरोपींना रविवारी (दि. 10) वडगाव मावळ न्यायालयात हजर करणार आहेत. वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर तपास करीत आहेत.