पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. शाळा समिती अध्यक्ष डॉ. प्राची साठे यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना, “आई, वडील, गुरुजनांचा आदर करा, गुरुशिष्य परंपरा स्मरण ठेवा”, असा संदेश दिला. साने गुरुजी कथामालेच्या माझी अध्यक्ष शोभना जोगळेकर यांनी श्रीकृष्ण संदीपनी यांची गोष्ट सांगितली. शिक्षिका स्वाती यादव यांनी गुरुपौर्णिमेची माहिती व धौम्य अरुणी यांची गोष्ट सांगितली.
इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी गुरुशिष्य परंपरा दाखविणारे नृत्य सादर केले. महर्षी व्यास-गणपती, सांदीपनी – श्रीकृष्ण, द्रोणाचार्य-अर्जुन, जिजाऊ -शिवराय, रामकृष्ण परमहंस – विवेकानंद, श्यामची आई – साने गुरुजी, रमाकांत आचरेकर – सचिन तेंडुलकर, अशा गुरु-शिष्य जोड्यांची वेशभूषा करून नृत्य नाट्य सादरीकरण केले.
मीनल कचरे यांनी गुरुशिष्य गीताचे लेखन केले होते. रुपाली सावंत यांनी सूत्रसंचालन केले. तनुजा टिकोने, धनंजय तळपे, भाग्यश्री हजारे, सोनाली मुंढे यांनी आयोजन सहाय्य केले. गुरुपौर्णिमेनिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना गोड शिरा खाऊ म्हणून देण्यात आला.